धाराशिव– पोहनेर- बेगडा- अपसिंगा- तुळजापूर जिल्हा मार्गाच्या रस्ता सुधारणा कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि उपअभियंत्यांना निलंबित करण्याची मागणी मनसेचे धाराशिव तालुकाध्यक्ष पाशाभाई शेख यांनी केली आहे.
शेख यांनी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पोहनेर-बेगडा आपसिंगा-तुळजापूर रस्ता प्रजिमा – 33 किमी 0/00 ते 7/00 मध्ये 2 कोटी 32 लाख रुपयांचे सुधारणा काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. या कामाची तपासणी करण्यासाठी गेलेल्या सहायक अभियंता के. एस. गायकवाड यांना ठेकेदाराने शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. हे सर्व घडत असताना उपअभियंता मोरे आणि कार्यकारी अभियंता चव्हाण हे अधिकारी उपस्थित होते, परंतु त्यांनी काहीही केले नाही.
या घटनेची गायकवाड यांनी लेखी तक्रार दिली असताही, मोरे आणि चव्हाण यांनी कोणतीही कारवाई केली नाही. ठेकेदाराशी आर्थिक व्यवहार करून त्याला पाठीशी घालणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाचे काम करून घेणाऱ्या या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शेख यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.