तुळजापूर! आई तुळजाभवानीची नगरी! भक्तांच्या श्रद्धेने भारलेला तो परिसर… आणि त्याच भूमीत काही पापी आत्म्यांनी ड्रग्जच्या जाळ्यात लोकांचं भविष्य उध्वस्त करण्याचा डाव आखला आहे!
हे काय चाललंय इथं? धर्म, संस्कृती, पवित्रता याचं तुळजापूरच्या मातीत काय मोल राहिलंय? आई तुळजाभवानीच्या दरबारात माथा टेकवून लोक सुख-समृद्धीची मागणी करतात, आणि इथे काही पापी ड्रग्जचा धंदा फुलवून तरुण पिढीला बरबाद करण्याचा उद्योग करतात!
काही महान लोक, माजी नगराध्यक्षांचे पती, सभापतींचे चिरंजीव – हे नेते आणि त्यांचे चमचे काय करतात? फोटोबाजी करतात, वाढदिवसाच्या जाहिराती देतात आणि त्या मागे काळे धंदे फुलवतात! एकीकडे आमदारांचे फोटो काढून प्रतिष्ठा मिरवायची आणि दुसरीकडे ड्रग्ज विकायचे? हे कसले राजकारण?
अहो, जनतेने तुम्हाला मतं दिली, आशीर्वाद दिले, त्याचा असा गैरवापर करणार का? तुळजाभवानीची कृपा घेऊन सत्तेच्या खुर्च्या मिरवणार आणि पाठीमागे ड्रग्जचा धंदा करणार? लाज कशी वाटत नाही तुम्हाला?
आई तुळजाभवानी, तुझ्या चरणी एकच अर्ज – या पापी लोकांचा नाश कर! तुझ्या पवित्र नगरीत असा अपवित्र धंदा फुलू देऊ नकोस. ज्यांनी तुझ्या नावाचा मक्ता घेतला, लोकांच्या विश्वासावर फसवणूक केली, त्यांना धडा शिकव. या पाप्यांना तूच शिक्षा कर आणि या नगरीचा पुनरुत्थान कर.
आजपर्यंत ३५ आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यात चार आरोपी अटकेत , दहा आरोपी जेलमध्ये आहेत, पण अजून २१ आरोपी फरार आहेत. काय चाललंय हे? फरार आरोपींना पकडून त्यांच्या काळ्या कृत्यांची लक्तरं वेशीवर टांगा. कोठडीत टाकून त्यांना शिक्षा करा.
आई तुळजाभवानी, या पापींचा नाश कर. तुझ्या पवित्र नगरीतील या अपवित्र कृत्यांचं निर्मूलन कर. तुझ्या चरणी आमची प्रार्थना – पाप्यांना माफ करू नकोस, त्यांचा नाश करून तुळजापूरची शुद्धता परत आण.
आई तुळजाभवानी की जय!
धाराशिव लाईव्ह नेहमीच सत्य मांडत आलं आहे आणि पेड पत्रकारितेपासून दूर राहिलं आहे. आमच्यासाठी पत्रकारिता म्हणजे सत्तेची मांडलिकता नव्हे, तर सत्याची बाजू घेणे आहे. लोकांचा आवाज बुलंद करणे हेच आमचं कर्तव्य आहे, आणि ते आम्ही प्रामाणिकपणे पार पाडत राहू.