येरमाळा – भरधाव वेगात असलेल्या ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ६५ हजार रुपये किमतीचे ५० कट्टे सोयाबीन बियाणे चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी (दि. २२ मे) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बोरी पेट्रोल पंप ते तेरखेडा दरम्यान ही चोरी झाली. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंकर मुरलीधर कदम (वय ४०, रा. ओगलेवाडी, ता. कराड, जि. सातारा) हे आपल्या ट्रकमधून बियाणे घेऊन जात होते. बोरी पेट्रोलपंप ते तेरखेडा या रस्त्यावर त्यांच्या ट्रकमधील पाठीमागील ताडपत्रीचा पडदा फाडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर ट्रकमधून सोयाबीन बियाण्याचे ५० कट्टे लंपास केले. चोरलेल्या बियाण्याची एकूण किंमत १ लाख ६५ हजार रुपये आहे.
या घटनेची माहिती मिळताच शंकर कदम यांनी येरमाळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम ३०५(ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.