पुणे: धाराशिव – बीड – छत्रपती संभाजीनगर या प्रस्तावित रेल्वे मार्गाचे पुन्हा सर्वेक्षण करून त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी जोरदार मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे. सोमवारी (ता. २३) पुणे येथे पार पडलेल्या मध्य रेल्वे विभागाच्या विभागीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत त्यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणी आणि विकासात्मक कामांसंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला.
या महत्त्वपूर्ण बैठकीला मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर श्री. धरम वीर मीना यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, डॉ. शिवाजी काळगे, निलेश लंके, धैर्यशील मोहिते पाटील, भाऊसाहेब वाघचौरे आणि विशाल पाटील उपस्थित होते. खासदार राजेनिंबाळकर यांनी धाराशिव, बार्शी, लातूरसह मराठवाड्यातील रेल्वे विकासासाठी अनेक मागण्या मांडल्या.
अमृत भारत योजनेसह स्थानकांच्या विकासावर भर
खासदार राजेनिंबाळकर यांनी बार्शी रेल्वे स्थानकाचा ‘अमृत भारत योजने’त समावेश करून त्याचा सर्वांगीण विकास करण्याची मागणी केली. तसेच, धाराशिव रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या विकासकामांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या तक्रारी असून, कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी रेल्वेचे महाप्रबंधक, अधिकारी व ठेकेदार कंपनी यांच्यासोबत संयुक्त पाहणी दौरा आयोजित करण्याची सूचना केली.
धाराशिव स्थानकावरील सुविधांसाठी आग्रह
धाराशिव स्थानकावर कोच इंडिकेटर, ए.टी.एम., लॉकर सुविधा, महिलांसाठी स्वतंत्र प्रतीक्षालय आणि दोन अतिरिक्त बुकिंग क्लार्कची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली. याशिवाय, माल उतरवण्यासाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म, गुड्स शेड आणि स्थानकाच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या (आर.पी.एफ.) कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
खासदार राजेनिंबाळकर यांच्या प्रमुख मागण्या:
-
नवीन रेल्वेमार्ग:
- धाराशिव – बीड – छत्रपती संभाजीनगर मार्गाचे काम बजेट मान्यतेनंतर त्वरित सुरू करावे.
- धाराशिव – तुळजापूर – सोलापूर रेल्वेमार्गाचे काम २०२७ अखेर पूर्ण करावे.
- नांदेड – लातूर रोड नवीन रेल्वेमार्गाच्या कामाला गती द्यावी.
- पंढरपूर – भूम – वाशी – बीड – जालना – शेगाव या नवीन मार्गाला मान्यता द्यावी.
- लातूर रोड – कुर्डुवाडी मार्गाच्या दुहेरीकरणाबाबत रेल्वे बोर्डाने भूमिका स्पष्ट करावी.
-
पायाभूत सुविधा व इतर मागण्या:
- वडगाव (ता. धाराशिव) येथे नवीन रेल्वे स्थानक उभारावे.
- धाराशिव – तुळजापूर – सोलापूर मार्गासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना नोकरीत विशेष आरक्षण द्यावे.
- ढोकी (लातूर रोड) येथे ओव्हरब्रिजचे बांधकाम तातडीने करावे.
- पुरी (ता. बार्शी) आणि जहागीरदारवाडी (ता. धाराशिव) येथील अंडरब्रिजच्या (यु.बी.) समस्या दूर कराव्यात.
-
रेल्वे थांबे आणि सेवा:
- हरंगुळ ते हडपसर मार्ग पूर्वीप्रमाणे पुन्हा सुरू करावा.
- एल.टी.टी. मुंबई – नांदेड गाडीला धाराशिव व बार्शी येथे थांबा मिळावा.
- लातूर – मुंबई गाडीला कळंब रोड (कसबे तडवळे) येथे थांबा मिळावा.
- नांदेड – पनवेल गाडीला ढोकी येथे थांबा मंजूर करावा.
या मागण्यांमुळे मराठवाड्यातील रेल्वे जाळे अधिक सक्षम होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केली. रेल्वे अधिकाऱ्यांनी या मागण्या सकारात्मकतेने घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.