धाराशिव: जिल्ह्यात चोरी आणि जबरी चोरीच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले आहे. उमरगा, परंडा आणि तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. यामध्ये बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेचे दागिने, शेतातून मोटारसायकल आणि प्रवाशाला अडवून रोख रक्कमेसह दागिने लुटल्याच्या घटनांचा समावेश आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उमरग्यात गर्दीचा फायदा घेत पाटली चोरली
पहिली घटना उमरगा बसस्थानक परिसरात घडली. फिर्यादी उर्मिला दत्तात्रय किरनाळे (वय ५८, रा. तोरंबा, ह.मु. न्यु बालाजी नगर, उमरगा) या १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उमरगा ते माकणी जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या. यावेळी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या हातातील ६२,००० रुपये किमतीची दोन तोळ्याची सोन्याची पाटली चोरून नेली. याप्रकरणी उर्मिला किरनाळे यांनी २० ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शेतातून मोटारसायकल लंपास
दुसरी घटना परंडा तालुक्यातील माणकेश्वर शिवारात घडली. फिर्यादी विशाल बापुराव विर (वय ४३, रा. माणकेश्वर, ता. भुम) यांनी १५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांची ७०,००० रुपये किमतीची टिव्हीएस कंपनीची मोटारसायकल (क्र. एमएच २५ बीडी ६०४७) गट नं ५२० मधील शेतात लावली होती. ही मोटारसायकल अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. याप्रकरणी विशाल विर यांनी २० ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूरजवळ प्रवाशाला अडवून लुटले
तिसरी घटना तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीची घडली आहे. फिर्यादी प्रकाश भाउराव घोडके (वय ५८, रा. मारुणी, ता. लोहारा, ह.मु. पुणे) हे २० ऑक्टोबर रोजी मध्यरात्री काक्रंबा चौकातून धाराशिव बायपासकडे जात होते. तडवळा शिवारात नैसर्गिक विधीसाठी त्यांनी गाडी उभी केली असता, समोरून मोटारसायकलवर आलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. चोरट्यांनी त्यांच्याकडील सोन्याची चैन व रोख रक्कम असा एकूण १,३९,२२० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. याप्रकरणी प्रकाश घोडके यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.