धाराशिव: जिल्ह्यात चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घटनांमध्ये मोटारसायकल, शेतकऱ्याची सौर मोटार, महिलेचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. तुळजापूर, नळदुर्ग आणि धाराशिव शहरात या घटना घडल्या असून, एकाच दिवशी (२४ सप्टेंबर) विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेचे दागिने चोरले
कर्नाटक राज्यातील बिदर येथून तुळजापूर येथे देवदर्शनासाठी आलेल्या गुंडम्मा रमेश कल्यापा (वय ४४) या महिलेच्या गळ्यातील ६०,००० रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात महिलेने कट करून चोरून नेले. ही घटना २४ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता श्री तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वाराजवळ घडली. गुंडम्मा या दुकानात साहित्य खरेदी करत असताना प्रिती शुभम पवार (रा. अकोला) नामक महिलेने ही चोरी केल्याचा संशय आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरासमोरून ६५ हजारांची मोटारसायकल लंपास
नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येवती येथे राहणारे प्रितम प्रभाकर गायकवाड (वय ३८) यांची ६५,००० रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (क्र. एमएच २५ एव्ही ८१४०) अज्ञात चोराने घरासमोरून चोरून नेली. २३ सप्टेंबरच्या रात्री ते २४ सप्टेंबरच्या सकाळच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शेतकऱ्याची ५० हजारांची सौर पाणबुडी मोटार चोरीला
नळदुर्ग हद्दीतीलच काटगाव शिवारात धुळाप्पा महादेव रक्षे (वय ५१) या शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीवरील ५०,००० रुपये किमतीची जी.के. एनर्जी कंपनीची सौर पाणबुडी मोटार, केबल आणि रस्सी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. १० आणि ११ सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडली असून, २४ सप्टेंबर रोजी नळदुर्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शासकीय रुग्णालयात गर्दीचा फायदा घेत पर्स पळवली
धाराशिव शहरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रोहिणी जनार्धन कोकीळ (वय ४५, रा. रामनगर) यांची पर्स आणि १८,००० रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोराने गर्दीचा फायदा घेऊन चोरून नेली. २४ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० ते ११.३० च्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.