मुरुम: उमरगा तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नराधम एवढ्यावरच थांबला नाही, तर घडलेल्या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास पीडितेसह तिच्या आईला जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून मुरुम पोलीस ठाण्यात गावातील तरुणावर लैंगिक अत्याचार, धमकी देणे आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दि. ०८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. पीडित १७ वर्षीय मुलगी घरी एकटी असताना गावातीलच एका तरुणाने तिला एका लॉजवर नेले. तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर, “झालेल्या प्रकाराबद्दल कोणाला सांगितल्यास तुला आणि तुझ्या आईला जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकी देऊन तिला गप्प केले.
घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने अखेर मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी मुरुम पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम ६४ (बलात्कार), ३५१(२) (जीवे मारण्याची धमकी देणे) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या कलम ४, ८ आणि १२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.