मुरुम : उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथील शाखा डाकघरातील (पोस्ट ऑफिस) ग्राहकांच्या खात्यातून परस्पर पैसे काढून तब्बल १ लाख ३७ हजार १०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुमारे दोन वर्षांच्या कालावधीत हा अपहार झाल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी डाकघर निरीक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरून मुरुम पोलीस ठाण्यात अजय अशोक बोईनवाड (वय २५, रा. मुरुम) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजय बोईनवाड याने दि. १२ एप्रिल २०२३ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत केसरजवळगा येथील पोस्ट ऑफिसमधील अनेक ग्राहकांच्या आणि खातेदारांच्या खात्यांमधून वेगवेगळ्या वेळी पैसे काढून फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर डाकघर निरीक्षक धनाजी लक्ष्मणराव मुंढे (वय ३५, रा. उमरगा) यांनी गुरुवारी, दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी मुरुम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अजय बोईनवाड विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ४०९, ४१५, ४०४, ४६८ आणि ४७७(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे पोस्ट ऑफिसच्या खातेदारांमध्ये खळबळ उडाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.