मुरूम – येथील भारत फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला भररस्त्यात अडवून, हंटरने बेदम मारहाण करत २ लाख ८० हजारांची रोकड लुटल्याच्या खळबळजनक घटनेचा मुरूम पोलिसांनी उलगडा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी (दि. २४) सायंकाळी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे या कटामध्ये कंपनीच्याच एका कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुरूम येथील भारत फायनान्स कंपनीच्या शाखेतील कर्मचारी रोहित जयवंत देडे (वय २५, रा. पानवाडी) हे १७ डिसेंबर रोजी महिला बचत गटांच्या कर्जाच्या हप्त्याची वसुली करून रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीवरून येणेगुरकडे निघाले होते. या प्रवासात कारखान्याजवळील एका दाळमिलजवळ ते आले असता, पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांची गाडी अडवली. चोरट्यांनी क्षणातच रोहित यांना हंटरने अमानुष मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्याकडील बॅग हिसकावून पळ काढला. या बॅगेत २ लाख ८० हजार रुपये रोख, दोन टॅब आणि दोन बायोमेट्रिक मशीन असा ऐवज होता.
घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या रोहित देडे यांना तातडीने मुरूम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या जबाबावरून मुरूम पोलिसांत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (६) व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासाअंती ५ जणांचा सहभाग निष्पन्न
पोलिसांनी या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासात या गुन्ह्यात एकूण पाच जणांचा सहभाग असल्याचे समोर आले. यामध्ये फिर्यादी काम करत असलेल्या फायनान्स कंपनीच्याच एका कर्मचाऱ्याचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पोलिसांनी बुधवारी सायंकाळी यातील तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून लुटलेल्या मुद्देमालापैकी निम्मा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
मात्र, प्रत्यक्ष घटनास्थळी रोहित देडे यांना मारहाण करून लुटमार करणारे दोन मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत. उर्वरित मुद्देमाल त्यांच्याकडेच असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार असून, पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.
ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक राहुल पतंगे, उपनिरीक्षक नवनाथ गाडेकर तसेच गोपनीय शाखेचे कर्मचारी नीलकंठ कटोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद साकळे आणि पो. हे. कॉन्स्टेबल अमर महानुरे यांच्या पथकाने केली आहे.
जखमी रोहित देडेवर धाराशिवमध्ये उपचार सुरू
चोरट्यांनी हंटरने केलेल्या बेदम मारहाणीत फिर्यादी रोहित देडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या हनुवटीला आणि तोंडावर जबर मार लागला असून, एका पायाला फॅक्चर झाले आहे. सध्या त्यांच्यावर धाराशिव येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.







