धाराशिव: मराठवाड्यातील प्रसिद्ध सुफी संत हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी (रहे.) यांच्या आगामी वार्षिक उरुसाच्या पार्श्वभूमीवर, भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसुविधांसाठी प्रशासनाने कडक नियमावली लागू करावी, अशी मागणी ‘मुस्लिम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशन’ने केली आहे. या संदर्भातील निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख अ. जब्बार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी यांचा वार्षिक उरुस २ जानेवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या काळात मोठ्या संख्येने भाविक शहरात दाखल होतात. त्यामुळे प्रशासनाने भाविकांच्या हिताला प्राधान्य देऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ते निर्णय घ्यावेत, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
-
सुरक्षिततेवर भर: उरुसामध्ये मनोरंजनासाठी लावले जाणारे झुले, पाळणे आणि ‘शोलँड’ यांसारख्या साधनांची तांत्रिक तपासणी करूनच त्यांना परवानगी देण्यात यावी. मागील काळात घडलेल्या आणि मांढरादेवी यात्रेत झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रशासनाने आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
-
दर नियंत्रण: उरुस काळात भाविकांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी हॉटेल, कटलरी दुकाने आणि मनोरंजनात्मक घटकांचे दर प्रशासनाने नियंत्रित ठेवावेत.
-
पारदर्शक निविदा प्रक्रिया: उरुस काळात लागणाऱ्या विविध सेवांसाठीची निविदा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवून भ्रष्टाचाराला आळा घालण्यात यावा.
-
वाहतूक आणि अतिक्रमण: दर्गा परिसरातून राज्यमार्ग क्रमांक २०३ जातो. या मार्गावर दुकाने थाटल्याने अतिक्रमण होऊन भाविकांना आणि नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे रस्ता अतिक्रमणमुक्त ठेवावा आणि वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रहदारी नियंत्रणाची योग्य व्यवस्था करावी.
-
अखंडित वीज पुरवठा: उरुस काळात विद्युत पुरवठा खंडित होऊ नये, याची दक्षता घ्यावी.
जिल्हाधिकारी हे देवस्थानचे अध्यक्ष असल्याने त्यांनी स्वतः जत्रेपूर्वी व जत्रेदरम्यान हजर राहून पाहणी करावी, अशी विनंती जिल्हाध्यक्ष शेख अ. जब्बार यांनी केली आहे. या निवेदनाची प्रत पोलीस अधीक्षक, कार्यकारी अभियंता (सा.बां. विभाग), मुख्याधिकारी आणि जिल्हा वक्फ अधिकारी यांनाही देण्यात आली आहे.






