तुळजापूर शहरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे हातात शस्त्रे घेऊन दहशत निर्माण केली असून, यामागे सत्तेचा माज आणि भाजपचा वरदहस्त असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीने केला आहे. भाजपचे उमेदवार विनोद उर्फ पिटू गंगणे आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर हल्लाबोल करत, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही तीव्र संशय व्यक्त केला आहे.
तुळजापूर येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव कुतवळ, जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमर मगर यांनी हा संयुक्त आरोप केला.
दहशतीचे वातावरण आणि पोलिसांचे मौन
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले की, तुळजापूर शहरात भाजपच्या गुंडांनी हातात कोयते, तलवारी आणि रिव्हॉल्व्हर घेऊन सुमारे दोन तास नंगानाच घातला. ऋषी मगर यांच्या घरावर जाऊन हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, ज्यात मगर गंभीर जखमी झाले असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. मात्र, या घटनेनंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी साधी विचारपूसही केली नाही. उलट, पोलिसांच्या संगनमताने हा प्रकार घडल्याचा आरोप नेत्यांनी केला आहे. “उपविभागीय पोलीस अधिकारी घटनास्थळी का फिरकले नाहीत? त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे का?” असा सवाल माधवराव कुतवळ यांनी उपस्थित केला.
ड्रग्ज कनेक्शन आणि सीडीआर तपासण्याची मागणी
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील यांनी या प्रकरणाला ड्रग्ज माफियांचे कनेक्शन असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “या हाणामारीतील आरोपी ड्रग्ज प्रकरणातील आहेत. त्यांचा सीडीआर (CDR) तपासून मुख्य सूत्रधाराचा (मास्टरमाईंड) शोध घ्यावा. भाजपचे कार्यकर्ते पोलिसांना ‘मॅनेज’ करण्यासाठी गेल्याचा आम्हाला संशय आहे. जर आम्हाला न्याय मिळाला नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि जशास तसे उत्तर देऊ.”
नेमकं काय घडलं? अमर मगर यांचा खुलासा
घटनेची पार्श्वभूमी सांगताना उमेदवार अमर मगर म्हणाले, “आमदार पाटील यांचे पीए जयेश कदम आणि पिटू गंगणे यांनी रस्ता काम करणाऱ्या अभियंत्याला दमदाटी केली. त्या अभियंत्याने ऋषी मगर यांना बोलावले असता, मगर यांनी वाद मिटवला. मात्र, त्यानंतर १५ मिनिटांतच दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी मगर यांच्या घरावर शस्त्रांसह हल्ला चढवला.” शहरात सध्या सुमारे २० गावठी कट्टे (पिस्तूल) गुंडांकडे असून पोलिसांचा वचक संपल्याची भीती मगर यांनी व्यक्त केली.
महाविकास आघाडीच्या मागण्या:
-
हल्ला करणाऱ्या आणि दहशत पसरवणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करावी.
-
पोलीस प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करू नये.
-
तुळजापूर सारख्या शक्तिपीठाच्या ठिकाणी गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही.
-
आरोपींचा सीडीआर तपासून मुख्य सूत्रधारावर कारवाई करावी.
या पत्रकार परिषदेला नागनाथ बहुभांजे, सुधीर कदम, धैर्यशील पाटील, भारत कदम, नरेश पेंदे, आनंद जगताप, रणजीत इंगळे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.






