धाराशिव: प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणाला धाराशिव जिल्ह्यात तीव्र विरोध होत असून, तालुक्यातील चिखली येथे परिस्थिती अधिकच चिघळली आहे. संतप्त शेतकऱ्यांनी थेट जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनाच दम भरला असून, “मोजणी केली तर हातपाय मोडू,” असा खणखणीत इशारा दिला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही काळापासून शक्तीपीठ महामार्गावरून शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. हा महामार्ग अनेक जिल्ह्यांतील सुपीक आणि बागायती जमिनींमधून जात असल्याने शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवला आहे. याच विरोधाचा भाग म्हणून धाराशिव तालुक्यातील चिखली गावात मोजणीसाठी पोहोचलेल्या शासकीय पथकाला शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला.
“आमच्या जमिनी आम्ही कोणत्याही परिस्थितीत या महामार्गासाठी देणार नाही. हा महामार्ग आमच्यासाठी विकासाचा नसून विनाशाचा मार्ग आहे,” अशी संतप्त भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी जमलेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत मोजणी अधिकाऱ्यांना काम थांबवण्यास भाग पाडले. “जर जबरदस्तीने मोजणी करण्याचा प्रयत्न केला, तर होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार असेल,” असेही शेतकऱ्यांनी बजावले.
या महामार्गामुळे हजारो हेक्टर शेतजमीन बाधित होणार असून, अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शासनाकडून मिळणाऱ्या मोबदल्याबाबतही शेतकऱ्यांमध्ये साशंकता आहे. याच पार्श्वभूमीवर, जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही आणि या प्रकल्पाबाबत योग्य तो तोडगा काढत नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत जमिनीची मोजणी होऊ देणार नाही, यावर शेतकरी ठाम आहेत.
चिखली येथील या घटनेने शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शेतकऱ्यांचा हा आक्रमक पवित्रा पाहता, आता प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Video