नळदुर्ग: शहरातील ईद-ए-मिलाद मिरवणुकीत औरंगजेबाच्या नावाचा जयघोष केल्याप्रकरणी आता वातावरण अधिकच तापले आहे. या प्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास नळदुर्ग शहर बंद ठेवून रास्ता रोको करण्याचा तीव्र इशारा सकल हिंदू समाज संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. संघटनेने या मागण्यांचे निवेदन नळदुर्ग पोलीस निरीक्षक आणि तुळजापूरच्या तहसीलदारांना सादर केले असून, पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
“फिर्याद द्या, मग गुन्हा दाखल करू” – पोलीस निरीक्षक
या गंभीर प्रकारानंतर सकल हिंदू समाजच्या शिष्टमंडळाने पोलीस ठाण्यात जाऊन जबाबदार समाजकंटकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावर पोलीस निरीक्षक यादव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी “तुम्ही फिर्याद दिली तर आम्ही गुन्हा दाखल करू,” अशी भूमिका घेतल्याचे समजते. पोलिसांच्या या पवित्र्यामुळे आंदोलकांमध्ये नाराजी पसरली आहे.
“पोलिसांचे कॅमेरे कुठे गेले? कुणाचा दबाव आहे?” – सकल हिंदू समाजाचा सवाल
पोलिसांच्या या भूमिकेवर सकल हिंदू समाज संघटनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संतप्त सवाल करत म्हटले की, “प्रत्येक मिरवणुकीत आणि उत्सवात पोलीस स्वतः व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असतात. मग ईदच्या मिरवणुकीतील पोलिसांचे कॅमेरे कुठे गेले? त्या फुटेजच्या आधारावर पोलीस स्वतःहून गुन्हा का दाखल करत नाहीत? पोलिसांवर नेमका कुणाचा राजकीय दबाव आहे का?”
या थेट प्रश्नांमुळे आता पोलीस प्रशासनही अडचणीत आले आहे. एकीकडे शहरात सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचे आव्हान असताना, दुसरीकडे आरोपींवर कारवाईसाठी दबाव वाढत आहे. या प्रकरणी पोलीस आता काय पाऊल उचलतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.