नळदुर्ग: आधीच मृत्यूचा सापळा म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या सोलापूर-उमरगा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दहा वर्षांपासून अक्षरशः ‘कासवगतीने’ सुरू असताना, आता या नाकर्तेपणाचा कळस गाठला गेला आहे. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी सुरू केलेला नळदुर्ग बायपासचा एकेरी मार्गही निकृष्ट कामामुळे खचला असून, तो दोन दिवसांपासून बंद ठेवण्यात आला आहे. परिणामी, वाहतूक पुन्हा नळदुर्ग शहरातून वळवण्यात आल्याने भीषण वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका प्रचंड वाढला आहे.
सोलापूर ते उमरगा या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दशकाहून अधिक काळ रखडले आहे. या अर्धवट आणि निकृष्ट कामामुळे हा मार्ग प्रवाशांसाठी अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे. दरवर्षी या मार्गावर किमान ५० हून अधिक निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागतात, तर शेकडो प्रवासी जखमी होतात. या महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार, हा प्रश्न अनुत्तरित असताना, आता नळदुर्ग बायपासची अवस्था अत्यंत लाजिरवाणी झाली आहे.
दोन महिन्यांपूर्वी मोठ्या गाजावाजा करत नळदुर्ग बायपासचा एकेरी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, संबंधित कंत्राटदाराने केलेले काम किती निकृष्ट दर्जाचे होते, याचा पर्दाफाश अवघ्या दोन महिन्यांतच झाला. या मार्गावर लगेचच मोठे खड्डे पडले आणि रस्ता खराब झाला. याची दुरुस्ती करण्याऐवजी, थेट मंगळवारपासून हा एकेरी मार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रस्त्याची दुरुस्ती सुरू असल्याचे थातूरमातूर कारण पुढे केले जात असले, तरी हे जनतेच्या पैशांची उधळपट्टी आणि कामातील बेफिकिरीचेच स्पष्ट उदाहरण आहे.
नळदुर्ग बायपासचे दोन्ही मार्ग १५ एप्रिलपर्यंत सुरू करण्यात येतील, असे आश्वासन महामार्ग अधिकाऱ्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना दिले होते. मात्र, अधिकाऱ्यांनी दिलेले हे आश्वासन निव्वळ हवेत विरले असून, १५ एप्रिलची मुदत उलटून गेल्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ बल्कि अधिक बिकट झाली आहे.
महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा आणि आता बायपासच्या बंद मार्गाचा त्रास सर्वसामान्य नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांना सोसावा लागत आहे. नळदुर्ग शहरातून होणारी वाहतूक कोंडी, यामुळे होणारा वेळेचा अपव्यय आणि अपघाताची टांगती तलवार यामुळे जनता त्रस्त आहे. प्रशासकीय अनास्था आणि कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून, आता बायपासही निकृष्ट कामामुळे बंद पडल्याने जनतेचा उद्रेक होण्याची शक्यता बळावली आहे. संबंधित प्रशासनाने आणि कंत्राटदारांनी तातडीने यावर तोडगा काढून महामार्गाचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे आणि बायपास त्वरित वाहतुकीसाठी सुरू करावा, अशी संतप्त मागणी जनतेकडून होत आहे.
अणदूर उड्डाण पूल: १० वर्षांपासूनचा ‘मृत्यूचा सापळा’, आश्वासने वाऱ्यावर, निष्पापांचे बळी सुरूच!
सोलापूर-उमरगा राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील दिरंगाई आणि प्रशासकीय नाकर्तेपणाचा सर्वात क्रूर नमुना म्हणजे अणदूर येथील अर्धवट अवस्थेतील उड्डाण पूल. गेल्या तब्बल दहा वर्षांपासून हा पूल ‘जैसे थे’ पडून आहे आणि दररोज या ठिकाणी अपघाताचा भीषण धोका कायम आहे.
हा अणदूरचा उड्डाण पूलही १५ एप्रिल पूर्वी पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन संबंधित यंत्रणेने दिले होते. मात्र, नळदुर्ग बायपासप्रमाणेच हे आश्वासनही निव्वळ ‘हवेत विरले’ असून, पुलाचे काम आजही अपूर्णावस्थेत आहे. प्रशासनाच्या या बेफिकिरीचा आणि कंत्राटदाराच्या मनमानीचा थेट फटका सर्वसामान्यांना बसत आहे.
या अर्धवट पुलामुळे येथील जवाहर विद्यालयातील विद्यार्थ्यांना अक्षरशः दररोज ‘जीव मुठीत धरून’ रस्ता ओलांडावा लागतो. शिक्षणासाठी बाहेर पडणाऱ्या या कोवळ्या जीवांना महामार्गावरील वेगात येणाऱ्या वाहनांचा धोका पत्करावा लागत आहे.
विशेषतः, या धोकादायक ठिकाणी आजवर ५ निष्पाप जणांचा बळी गेला असून, १६ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. ही आकडेवारी प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे, पण तरीही त्यांच्यावर काही परिणाम झाल्याचे दिसत नाही.
इतकंच नाही, तर सोलापूरहून उमरग्याकडे जाणाऱ्या अनेक बस अणदूर बसस्थानकात न थांबता याच उड्डाण पुलाच्या अगदी विरुद्ध दिशेला, म्हणजे अत्यंत धोकादायक ठिकाणी थांबतात. यामुळे बस पकडण्यासाठी गडबडीत धावणाऱ्या प्रवाशांना जीवघेण्या अपघाताचा धोका पत्करावा लागतो.
अणदूरचा हा अर्धवट उड्डाण पूल केवळ एक बांधकाम नसून, प्रशासकीय उदासिनता आणि दिरंगाईमुळे बनलेला एक ‘मृत्यूचा दरवाजा’ ठरत आहे. जबाबदार यंत्रणेने तात्काळ पावले उचलून हे काम पूर्ण करावे आणि लोकांचे बळी जाणे थांबवावे, अन्यथा जनतेचा संयम सुटल्याशिवाय राहणार नाही!