तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग बायपास हा रस्ता जसा सुरू झाला, तितक्याच वेगाने बंदही झाला! अवघ्या आठ दिवसांतच वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या या मार्गाने पुन्हा नळदुर्ग शहरातूनच वाहतूक सुरू झाली आहे.
१० वर्षांचा गोंधळ – तीन ठेकेदार गायब!
सोलापूर-उमरगा चार पदरी महामार्गाचे काम गेल्या १० वर्षांपासून सुरूच आहे. एक ठेकेदार येतो, काही काम करतो आणि गायब होतो. कारण? स्थानिक नागरिकांचे म्हणणे – अधिकारी आणि राजकीय नेत्यांची टक्केवारी खेळ सुरू असल्यामुळे काम अर्धवट राहते. आतापर्यंत तीन मोठे कंत्राटदार अधुरी कामे सोडून फरार झाले आहेत.
अर्धवट पूल, अर्धवट रस्ता – पण टोल फुल्ल!
फुलवाडी ते जळकोट रस्ता अर्धवट, अणदूर उड्डाणपूल अधुरा, पण टोल मात्र अगदी व्यवस्थित सुरू! नागरीकांना अपघात, वाहतूक कोंडी आणि जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय.
“यमाचा रस्ता” – ५० बळी, अनेक अपंग!
या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात जड वाहने आणि कंटेनरची वर्दळ असते. परिणामी, वारंवार अपघात होऊन वर्षभरात ५० जणांचा मृत्यू, तर अनेकजण कायमचे अपंग झाले आहेत. त्यामुळे “यमाचा रस्ता”, “मृत्यूचा मार्ग” अशी ओळख या रस्त्याला मिळाली आहे.
फेसबुक लाइव्ह आणि राजकीय नौटंकी!
एका राजकीय नेत्याने फेसबुक लाइव्ह करून नळदुर्ग बायपासची सफर घडवली, पण प्रत्यक्षात सुधारणा शून्य! दहा वर्षांत मोठमोठे प्रकल्प, पूल, भुयारी मार्ग पूर्ण झाले, पण फक्त तीन किलोमीटरचा बायपास पूर्ण होऊ शकत नाही!
अर्धवट रस्ता सुरू करण्याची घाई का? आठ दिवसांत बंद का?
नळदुर्ग बायपास होण्याअगोदर तीन तरुणांचा जीव धोक्यात आला! रात्रीच्या वेळी मोटारसायकलस्वार रस्त्यावरील फटीतून पडले, त्यात एकाचा मृत्यू झाला तर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.
बायपास नाही, मृत्यूचा सापळा!
या बायपासवर दिशादर्शक फलक नाहीत, सुरक्षा उपाय शून्य, रस्ता अर्धवट, आणि त्यातच वाहतूक उघडण्याचा हलगर्जीपणा केला गेला. श्री खंडोबा मंदिराकडे जाण्यासाठी भुयारी मार्गच नाही, त्यामुळे वाहनचालक गोंधळून चुकीच्या रस्त्यावर जातात.
कोट्यवधींचे महामार्ग पूर्ण, पण नळदुर्ग बायपास आणि अणदूर पूल अधुराच!
दहा वर्षांत राज्यात अनेक महामार्ग आणि भुयारी मार्ग पूर्ण झाले, पण नळदुर्ग बायपास आणि अणदूर उड्डाण पूल मात्र अजूनही अर्धवट अवस्थेत! हे अपयश नक्की प्रशासनाचे की ठेकेदारांचे, की नेत्यांचे?
लाजा बाळगा!
रस्ते बांधणीच्या गोंधळामुळे नागरिकांचे प्राण धोक्यात आले आहेत. बायपास अर्धवट असल्याचे माहीत असूनही तो का सुरू केला? आणि आता आठ दिवसांतच बंद का केला? याचा जबाबदार कोण? या गलथान कारभाराची जबाबदारी कोण घेणार?
नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकारी, ठेकेदार आणि नेत्यांनी आता तरी लाज बाळगावी!
हा विकास की विनाश?
रस्त्यांचे कोट्यवधींचे अंदाजपत्रक, ठेकेदारांचे आगमन आणि पलायन, अपघातांचे सत्र आणि सामान्य जनतेचे हाल – या सगळ्याला जबाबदार कोण? तीन किलोमीटर रस्ता पूर्ण न करता शासन काय साध्य करू पाहतंय? उत्तरदायित्व कोणाचे? असा प्रश्न आता संतप्त जनतेकडून विचारला जातोय.
नळदुर्ग बायपास कधी पूर्ण होणार? की हा मृत्यूचा सापळा असाच कायम राहणार?