नळदुर्ग (ता. तुळजापूर) : येथील शिवराज हॉटेलसमोर मंगळवारी रात्री झालेल्या पप्पू सुरवसे या तरुणाच्या निर्घृण खून प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तसेच, या घटनेतील आणखी एक आरोपी जखमी झाला असून, त्याला नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस त्याच्यावर कडक पाळत ठेवून आहेत. दरम्यान, मयत पप्पू सुरवसे हे दलित समाजाचे नेते होते व सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता, अशी माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अटक करण्यात आलेले आणि संशयित आरोपी हे देखील त्याच समाजाचे असल्याचे समजते.
तत्पूर्वी, पप्पू सुरवसे यांच्या खुनानंतर संतप्त नातेवाईकांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मयताचे पोस्टमार्टम करू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. या पार्श्वभूमीवर एका आरोपीला अटक झाल्याने पोलिसांना तपासात महत्त्वाचे यश मिळाले आहे.
पप्पू सुरवसे यांच्यावर दोन ते तीन व्यक्तींनी कोयत्याने सपासप वार करून त्यांचा जागीच खून केला होता. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत होता. आता एका आरोपीला अटक झाल्याने आणि दुसरा जखमी अवस्थेत पोलिसांच्या ताब्यात असल्याने हत्येमागील नेमके कारण लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
पप्पू सुरवसे हे दलित समाजाचे एक उभरते नेतृत्व म्हणून ओळखले जात होते आणि सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रेसर असत. त्यांच्या अशा निर्घृण हत्येमुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोपी आणि मयत एकाच समाजाचे असल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. नळदुर्ग पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. परिसरातील तणावपूर्ण शांतता असून, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.