धाराशिव: नळदुर्ग येथील दिशा नागरी पतसंस्थेत ८ नोव्हेंबर रोजी झालेला कोट्यवधी रुपयांचा दरोडा उघडकीस आणण्यात धाराशिवच्या स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या पतसंस्थेत कामाला असलेला लिपिकच या दरोड्याचा मुख्य सूत्रधार (मास्टरमाईंड) असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने लिपिकासह त्याच्या तिघा अट्टल साथीदारांना पुणे येथून वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत १ कोटी ७५ हजार रुपये किमतीचे, सुमारे दीड किलो (१ किलो ४९२ ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
दिनांक ०८ नोव्हेंबर २०२५ रोजी नळदुर्ग येथील दिशा नागरी पंतसंस्थेमधील तिजोरी तोडून, कर्जदारांचे तारण ठेवलेले ४ किलो ७६३ ग्रॅम सोने व २,२१,००० रुपये रोख रक्कम असा एकूण २ कोटी ६३ लाख ६३ हजार २७२ रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद (गुरनं ३९८/२५) करण्यात आला होता.
तांत्रिक विश्लेषणातून लागला छडा
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्याकडे देण्यात आला. श्री. इज्जपवार यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या (Technical Analysis) आधारे तपास सुरू केला असता, बँकेत लिपिक म्हणून कामास असणारा राहूल राजेंद्र जाधव (रा. नळदुर्ग) यानेच आपल्या साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावे उघड केली.
पुणे येथून अट्टल आरोपींना अटक
पोनि इज्जपवार यांनी तात्काळ सपोनि कासार व पथकाला आरोपींच्या अटकेसाठी रवाना केले. तपासात समोर आलेले आरोपी हे अत्यंत अट्टल व निर्ढावलेले गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापूर्वी दरोडा, जबरी चोरी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आरोपींचा कोणताही निश्चित ठावठिकाणा नसतानाही, LCB च्या पथकाने केवळ तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने ०३ आरोपींना पुण्यातून वेगवेगळ्या ठिकाणांहून अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.
विहिरीत लपवले होते दागिने
आरोपींकडे केलेल्या चौकशीत, त्यांनी चोरी केलेल्या मुद्देमालापैकी काही दागिने शेतातील एका विहिरीत लपवून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी नमूद ठिकाणी जाऊन शोध घेतला असता, एकूण १ किलो ४९२ ग्रॅम ७०० मिली वजनाचे (किंमत १,००,७५,७२५ रुपये) दागिने मिळून आले, जे पंचनामा करून जप्त करण्यात आले आहेत.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१. राहुल राजेंद्र जाधव (लिपिक, रा. नळदुर्ग)
२. सुशिल संजय राठोड (रा. नळदुर्ग)
३. संजय अमृत जाधव (रा. लाडवंतीवाडी, कर्नाटक)
४. शिलरत्न महादेव गायकवाड (रा. औराद, ता. उमरगा)
या चारही आरोपींना अटक करण्यात आली असून, ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्याकडून उर्वरित मुद्देमाल आणि अन्य साथीदारांबाबत कसून तपास सुरू आहे.
पतसंस्थांना सुरक्षा ऑडिटचे आवाहन
या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर, पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी जिल्ह्यातील सर्व सहकारी पतसंस्थांना आपापल्या संस्थांचे ‘सुरक्षा ऑडिट’ (Security Audit) करून घेण्याचे आणि आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
सदरची प्रशंसनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व तुळजापूरचे पोलीस उपअधीक्षक श्री. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि श्री. विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, सपोनि नंदकिशोर सोळंके, पोउपनि ईश्वर नांगरे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या संपूर्ण पथकाने केली आहे.
ठळक मुद्दे:
-
स्थानिक गुन्हे शाखेची पुण्यात मोठी कारवाई; तिघा अट्टल गुन्हेगारांसह एकूण चौघे जेरबंद.
-
आरोपींकडून १ किलो ४९२ ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत १ कोटींहून अधिक) जप्त.
-
शेतातील विहिरीत लपवला होता मुद्देमाल.







