नळदुर्ग – शेतातील उभ्या पिकांची नासधूस करून शेतकऱ्याला शिवीगाळ, मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चौघा जणांविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना तालुक्यातील येडोळा शिवारात २ ते ३ सप्टेंबरच्या रात्रीदरम्यान घडली.
याप्रकरणी शेतकरी सुधिरसिंग जयरामसिंग परिहार (वय ४४, रा. येडोळा, ता. तुळजापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, सुरजसिंग जयरामसिंग परिहार, रोहीतसिंग किशोरसिंग परिहार, रणजितसिंग गुड्डुसिंग परिहार (सर्व रा. येडोळा) आणि अमोलसिंग प्रेमसिंग बायस (रा. सोलापूर) यांनी २ सप्टेंबरच्या सायंकाळपासून ते ३ सप्टेंबरच्या सकाळपर्यंतच्या काळात फिर्यादीच्या शेतात प्रवेश केला.
आरोपींनी शेतातील शिताफळ, आंबा, चिंच, जांभूळ, झेंडू, वांगे आणि टमाट्याचे पिक तुडवून मोठे नुकसान केले. तसेच शेतातील पाईपलाईनचीही तोडफोड केली. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या सुधिरसिंग परिहार यांना आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
सुधिरसिंग परिहार यांनी ३ सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलिसांनी वरील चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.