नळदुर्ग (ता. तुळजापूर) : येथील बस स्थानकासमोरील शिवराज हॉटेलसमोर मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. पप्पू सुरवसे नामक तरुणावर दोन ते तीन अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने सपासप वार करून त्याचा जागीच खून केला. या घटनेमुळे नळदुर्ग परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला इतका भीषण होता की पप्पू सुरवसे रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळीच गतप्राण झाला. घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तात्काळ पथके रवाना केली आहेत.
प्राथमिक तपासात ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका धक्कादायक माहितीनुसार, हल्लेखोर हा मयत पप्पू सुरवसे याच्या ओळखीचा असल्याचे समजते. दोघांमध्ये सुरू असलेल्या भांडणादरम्यान, समोरच्या व्यक्तीच्या मुलाने कोयता आणून पप्पू सुरवसे याच्यावर सपासप वार करून त्याला ठार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे नळदुर्ग परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.