धाराशिव: तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील बस स्थानकावर शाळकरी मुलींसमोर मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ पाहण्याच्या गंभीर प्रकरणी आरोपी मौलवी कासीम अब्दुल रहीम इनामदार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, त्याच्यावर लावण्यात आलेली कलमे सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची असल्याने त्याला अटक करण्यात आलेली नाही. सध्या त्याला ताब्यात ठेवून तपास सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव यांनी दिली आहे. यावरून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
२ ऑगस्ट २०२५ रोजी नळदुर्ग बस स्थानकात, समाजाला नीतिमत्तेचे धडे देणाऱ्या एका मौलवीनेच अत्यंत निर्लज्ज प्रकार केल्याची धक्कादायक घटना घडली. कासीम अब्दुल रहीम इनामदार (रा. रहीमनगर, नळदुर्ग) असे या आरोपीचे नाव असून, तो एका धार्मिक शाळेत शिक्षक असल्याचे समोर आले आहे. घटनेच्या दिवशी दुपारी सव्वा एकच्या सुमारास, बस स्थानकावर महिला आणि शाळकरी मुलींसमोर त्याने मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ लावून अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली.
या विकृत प्रकारामुळे तेथे उपस्थित असलेल्या विद्यार्थिनी आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले व त्या लज्जेने मान खाली घालून दुसरीकडे निघून गेल्या. हा प्रकार असह्य झाल्याने, सुनील माणिकराव गव्हाणे (वय ३९) यांच्यासह काही नागरिकांनी त्याला जाब विचारला. विशाल डुकरे नावाच्या एका नागरिकाने हा सर्व किळसवाणा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.
पोलिसांची कारवाई आणि लोकांचा संताप
या घटनेप्रकरणी ५ ऑगस्ट रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २९४(१), २९४(२)(अ) आणि २९६ अन्वये गुन्हा नोंदवला. मात्र, आरोपीला अटक न करता केवळ ताब्यात घेतल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. आरोपी हे कृत्य वारंवार करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याच्यावर लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पॉस्को) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा द्यावी, अशी तीव्र मागणी आता जोर धरू लागली आहे.. पवित्र मानल्या जाणाऱ्या पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे नळदुर्ग परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.