नळदुर्ग : नळदुर्ग बसस्थानकातील विकृत मौलवी प्रकरणात, पोलिसांच्या हलगर्जीपणा आणि अक्षम्य दुर्लक्षाचे एक-एक थर आता उलगडू लागले आहेत. आरोपी मौलवी हा गेल्या अनेक दिवसांपासून बसस्थानकात बसून पॉर्न व्हिडिओ पाहत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे, बसस्थानकाच्या वाहतूक नियंत्रकांनी याबाबत पोलिसांना तोंडी माहिती देऊनही, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेमुळे तीव्र संताप व्यक्त होत असून, वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांना (API) तात्काळ निलंबित करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
गुन्हेगारांना मोकळे रान, पोलिसांचे दुर्लक्ष
नळदुर्ग बसस्थानक सध्या गुन्हेगारांसाठी नंदनवन बनले आहे. येथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. दररोज होणाऱ्या चोऱ्या, गुंडगिरी आणि महिलांच्या छेडछेडीच्या घटनानंतरही, येथे एकाही पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली नाही. याच परिस्थितीचा फायदा घेत आरोपी मौलवी अनेक दिवसांपासून आपला विकृत चाळा करत होता. वाहतूक नियंत्रकांनी याची कल्पना पोलिसांना दिली, पण त्यांनी याकडे पूर्णपणे कानाडोळा केला.
नागरिकांचे धाडस, पोलिसांची दिरंगाई
२ ऑगस्ट रोजी जेव्हा दोन धाडसी तरुणांनी या विकृत मौलवीचे व्हिडिओ शुटींग करून पुरावा पोलिसांना दिला, तेव्हादेखील पोलिसांनी तब्बल तीन दिवस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. गुन्हा दाखल केलाच, तर तोही अत्यंत किरकोळ कलमांखाली. पीडितांमध्ये शाळकरी मुलींचा स्पष्ट उल्लेख असतानाही, ‘पोक्सो’सारखे महत्त्वाचे कलम जाणीवपूर्वक वगळण्यात आले. या सर्व दिरंगाईचा आणि सौम्य कारवाईचा परिणाम म्हणून, आरोपीला फरार होण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला.
पोलिसांची ही संपूर्ण कार्यपद्धती आरोपीला वाचवण्यासाठीच होती, असा थेट आरोप आता केला जात आहे. या प्रकरणी केवळ वरवरची कारवाई न करता, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून यातील सत्य बाहेर आणावे आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह जबाबदार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.