नळदुर्ग: ईद-ए-मिलाद मिरवणुकीत औरंगजेबाच्या नावाचा जयघोष केल्याच्या घटनेचे पडसाद आता अधिक तीव्र झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी सकल हिंदू समाज संघटनेने येत्या गुरुवारी, दिनांक ११ सप्टेंबर रोजी ‘नळदुर्ग बंद’ची हाक दिली आहे.
या दिवशी शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात येणार असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे. शहरातील सर्व व्यापारी आणि हिंदू बांधवांनी या बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या आंदोलनाचा भाग म्हणून, गुरुवारी सकाळी १०:३० वाजता शहरातील भवानी चौक येथे सर्वांनी एकत्र जमावे, असे आवाहन सकल हिंदू समाजच्या वतीने करण्यात आले आहे. येथून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी रविवारी ( दि. ७ सप्टेंबर ) नळदुर्ग शहरात पैगंबर जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलाद) एक मिरवणूक काढण्यात आली होती. याच मिरवणुकीदरम्यान, काही तरुणांनी अचानक ‘आलमगीर औरंगजेब’ या नावाने घोषणा देण्यास सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना अनन्वित छळ सोसावा लागलेल्या ज्या औरंगजेबाला महाराष्ट्राचा शत्रू मानले जाते, त्याच्याच नावाचा जयघोष महाराष्ट्राच्या भूमीत झाल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. या घटनेचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सकल हिंदू समाजाचा आक्षेप आणि पोलिसांची भूमिका
या घटनेनंतर, सकल हिंदू समाज संघटनेच्या नेतृत्वाखाली शहरातील नागरिक आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत या प्रकाराचा तीव्र निषेध केला. त्यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस निरीक्षक आणि तुळजापूरच्या तहसीलदारांना निवेदन सादर केले. या निवेदनात, सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणाऱ्या या समाजकंटकांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली.
यावर पोलिसांनी, “तुम्ही तक्रार (फिर्याद) दाखल करा, त्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करू,” अशी भूमिका घेतली. पोलिसांच्या या भूमिकेवर सकल हिंदू समाजाने तीव्र आक्षेप घेतला. “प्रत्येक मिरवणुकीत पोलीस स्वतः चित्रीकरण करतात, ते फुटेज तपासून पोलीस स्वतःहून गुन्हा का दाखल करत नाहीत? पोलिसांवर कुणाचा राजकीय दबाव आहे का?” असे संतप्त सवाल संघटनेकडून उपस्थित करण्यात आले.