धाराशिव – जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या धाराशिव शहरातील नव्या मध्यवर्ती बस स्थानकात आज पहाटे एक मोठी दुर्घटना सुदैवाने टळली. चालक-वाहकांसाठी असलेल्या विश्रांती कक्षाचे पीव्हीसी पॅनल सिलिंग पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळले. घटनेवेळी कक्षात पाणी गळत असल्याने कर्मचारी दुसरीकडे झोपायला गेले होते, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेने धाराशिव बसस्थानकाच्या बांधकामाच्या दर्जावर आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा सुमारे ३० ते ४० चालक-वाहक या विश्रांती कक्षात झोपले होते. मात्र, मध्यरात्री छतावरून पाणी गळत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी खबरदारी म्हणून आपली झोपण्याची जागा बदलली. त्यानंतर काही वेळातच मोठा आवाज होऊन सिलिंगचा संपूर्ण भाग खाली कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली, पण ते सर्वजण थोडक्यात बचावले.
उद्घाटनापासूनच वादाच्या भोवऱ्यात
विशेष म्हणजे, तब्बल १० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या बसस्थानकाचे काम पूर्ण होण्याआधीच, पाच महिन्यांपूर्वी १ मे रोजी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते घाईगडबडीत उद्घाटन करण्यात आले होते. तेव्हापासूनच या बस स्थानकात पाणी गळती, निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि इतर अनेक त्रुटींबद्दल तक्रारी येत होत्या. “केवळ पाच महिन्यांतच १० कोटींच्या कामाचे सिलिंग कोसळणे हा निव्वळ भ्रष्टाचार आहे,” असा संतप्त आरोप आता प्रवासी आणि स्थानिक नागरिक करत आहेत.
चौकशी समितीचे काय झाले?
या घटनेनंतर पालकमंत्री सरनाईक यांचे, “हे माझं दुर्भाग्य समजतो,” हे उद्घाटनानंतरचे विधान पुन्हा चर्चेत आले आहे. यापूर्वी बांधकामातील त्रुटींवर प्रश्न विचारला असता, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्या समितीच्या अहवालाचे काय झाले आणि कोणाला दोषी ठरवले, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.
स्ट्रक्चरल डिझाइनमध्येच त्रुटी?
परिवहन विभागातील काही अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर, बसस्थानकाच्या मूळ स्ट्रक्चरल डिझाइनमध्येच गंभीर त्रुटी असल्याचे सांगितले. याच कारणामुळे अकाउंट आणि कॅश विभागासारखी महत्त्वाची कार्यालये अजूनही जुन्या आणि जीर्ण इमारतीतूनच चालवली जात आहेत. “अपूर्ण काम असताना उद्घाटनाची घाई का केली गेली? लोकांच्या जीवाशी खेळण्याची जबाबदारी कोण घेणार?” असे संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
या गंभीर घटनेनंतरही सत्ताधारी आणि विरोधकांनी मौन बाळगल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. “उद्घाटनावेळी फित कापून फोटो काढणारे नेते आज कोसळलेल्या छताखाली उभे राहण्याची हिंमत दाखवतील का?” असा उपरोधिक टोलाही नागरिकांकडून लगावला जात आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदार, अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.