धाराशिव : “राणा पाटील यांच्या प्रत्येक कामात एक कन्सल्टन्सी का असते याचे उत्तर द्या! दुसऱ्याच्या नावाने स्वतः पैसे कमविण्याची नवी पद्धत यांनीच जिल्ह्यात आणली आहे,” अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे गटाच्या युवा सेनेचे राज निकम यांनी केली आहे. अभय इंगळे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, “कचऱ्याच्या कामात गुत्तेदारी करणाऱ्या अभय इंगळे यांची धाव गल्लीपर्यंतच आहे,” अशा शब्दांत निकम यांनी इंगळेंना टोला लगावला.
राज निकम पुढे म्हणाले की, “सोमनाथ गुरव यांनी सर्व मुद्देसूद माहिती दिल्यानंतर भाजपच्या सर्व हुशार लोकांनी एकत्र येऊन हे प्रसिद्धीपत्रक काढले. चौकात बोलावे अशा पद्धतीने हे पत्रक आहे. यावरून तुमची लोकांसमोर मुद्दे घेऊन जाण्याची क्षमता व मानसिकता दिसत नाही. तुम्हाला फक्त राजकारण करायचे असून तुमच्या लेखी जनतेची किंमत शून्य आहे.”
राणा पाटील यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करताना निकम यांनी सांगितले की, “राणा पाटील प्रत्येक मोठ्या कामात कन्सल्टन्सी नेमतात. ती फक्त नावाला असते; त्या कंपनीच्या नावाने पैसे राणा पाटलांच्या खिशात कसे जातात याचे किस्से आम्ही त्यांच्या सोबत असताना ऐकले आहेत. त्याचे चांगले उदाहरण म्हणजे उजनी पाईपलाईन हे आहेच.”
अभय इंगळे यांच्यावर निशाणा साधताना निकम यांनी एक खळबळजनक दावा केला. “अभय इंगळे हे कालच अमित शिंदे यांना ‘प्रेस नोट का द्यायला लावली’ म्हणून भांडण करत होते. त्यांची ही धडपड पाहून त्या पक्षातून बाहेर पडल्याचे समाधान आहे,” अशी कोपरखळीही निकम यांनी मारली.
या आरोप-प्रत्यारोपांमुळे धाराशिवचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आगामी काळात या प्रकरणाला आणखी काय वळणे येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.