परंडा – दरोडा, जबरी चोरी आणि घरफोडी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या एका सराईत गुन्हेगारावर परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनाजी झकीऱ्या पवार (वय ३९, रा. बोंबाळे, ता. खटाव, जि. सातारा) असे या आरोपीचे नाव असून, तो एका दरोडेखोर टोळीचा सदस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धनाजी पवार याच्यावर यापूर्वी वडूज, विटा आणि आपाडी पोलीस ठाण्यांमध्ये भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांनुसार दरोडा, फसवणूक, घरफोडी आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्यावर मोक्का कायद्यांतर्गतही कारवाई झालेली आहे.
आरोपी पवार हा पुन्हा अशाच प्रकारचे गुन्हे करण्याची शक्यता असल्याने, परंडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले शिवकुमार धर्मराज घोळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्यावर दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१३ अन्वये गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.