उमरगा – कर्नाटक राज्यातून बीड जिल्ह्यात जाणारा गुटख्याचा एका आयशर टेम्पो उमरगा पोलिसांनी ताब्यात घेऊन ४० लाखाचा गुटखा जप्त केला आहे. तसेच टेम्पोचालकावर गुन्हा दाखल केला आहे. पण मुख्य म्होरक्या एन. पी.ला अटक करण्याचे पोलीस धाडस करणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.15.9.2023 रोजी उमरगा पो. ठाणेचे प्रभारी अधिकारी पारेकर यांना मिळालेल्या बातमी प्रमाणे चौरस्ता उमरगा येथे नाकाबंदी नेमुन हैद्राबाद कडून सोलापूर कडे जाणारे येणारे वाहने चेक करत असताना समोरुन येणारे वाहन क्र एम.एच. 20 इ.जी. 5357 आयशर टॅम्पो हे वाहन नाकाबंदी दरम्यान चेक केले असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा मिळून आला.
यातील चालक आरोपी नामे- मुराद लाल शेख रा. गेवराई, ता. जि. छत्रपती संभाजीनगर याचे ताब्यात सदर वाहनात गोवा गुटखा एकुण 54 मोठ्या गोण्या मिळून आल्या. अंदाजे 39,76,000₹ किंमतीचा माला सह आयशर वाहन अंदाजे 10,50,000₹ किंमतीचा असा एकुण 50,26,000₹ किंमतीचा माल मिळून आलेने जप्त करुन मिळून आलेला एका आरोपी नामे- मुराद लाल शेख रा. गेवराई, ता. जि. छत्रपती संभाजीनगर याचे विरुध्द पोलीस ठाणे उमरगा येथे गुरनं 560/2023 भा.द.वि. सं. कलम 328, 272, 273, 188 सह अन्न व सुरक्षा व मानके कायदा 2006 मधील कलम 26 (2), (आय), 26(2) (आय.व्ही), 27 (3), (ई), 30(2) दंडनिय कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड करत आहे.
सदर कामगिरी ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी . बरकते , उमरगा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक पारेकर, सपोनि गायकवाड सपोनि कासार, पोलीस अमंलदार/1759 मोरे, 1752/ घाटे, 1535/ भोरे, 163/अनसरवाड, 1806/ कांबळे, 1701/ उंबरे, यांचे पथकाने केली.
मुख्य म्होरक्या एन. पी.ला अटक करण्याचे धाडस पोलीस करणार का ?
कर्नाटक राज्यातून महाराष्ट्र राज्यात येणारा गुटखा उमरगा, नळदुर्ग मार्गे पुढे जातो. त्याचा मुख्य सूत्रधार एन. पी. असून आजवर त्याच्यावर जिल्ह्यात कुठेही एफआयआर नोंदवला गेला नाही. गुटख्याची अनेक वाहने दररोज उमरगा, नळदुर्ग येथून पुढे जातात. त्याची माहिती पोलिसाना असते, पण नोंदीसाठी महिन्यातून एखाद्या वाहनावर कारवाई केली जाते, वाहन चालकावर गुन्हा दाखल केला जातो, पण ज्याने पुरवठा केला आणि ज्यांच्यासाठी खरेदी केला त्याला मात्र सोडले जाते. गुटख्याचा ठराविक हप्ता येरमाळ्याच्या के.पी. मार्फत दर महिन्याला पोहच केला जातो. त्यामुळे छोटे मासे अडकत असले तरी बडे मासे मात्र अजूनही मोकळेच आहेत.
महाराष्ट्रात गुटखा बंदी असली तरी ती फक्त कागदावर आहे. जप्त केलेला गुटखा खरंच जाळला जातो का ? हाही एक प्रश्न आहे. धाराशिवमधील आनंदनगर पोलिसांनी पकडलेला गुटखा, नंतर तोच गुटखा धाराशिव ग्रामीण पोलिसांनी आणि नंतर स्थानिक गुन्हे शाखेने कसा पकडला ? याची रसभरीत चर्चा सध्या सुरु आहे. तोच गुटखा पुढे कसा परत केला जातो आणि कागदोपत्री कसा जाळला जातो याची किस्सेही सध्या सुरु आहेत.