उमरगा : मुलीच्या कॉलेजमधील परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी बाहेर गेलेल्या महिलेचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १ लाख ७० हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना उमरगा शहरातील समता नगर भागात घडली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी उषा बुध्दार्थ झाकडे (वय ४९, रा. समता नगर) या दि. २४ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १२ ते ३ वाजण्याच्या सुमारास आपल्या मुलीचा सी.ई.टी. परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी घराजवळील श्रमजिवी कॉलेजमध्ये गेल्या होत्या. त्यांनी आपल्या घराला कुलूप लावले होते.
त्या घरी नसताना हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले एकूण १,७०,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. घरी परतल्यावर चोरीचा हा प्रकार त्यांच्या लक्षात आला.
या घटनेप्रकरणी उषा झाकडे यांनी दि. १३ जुलै २०२५ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४) आणि ३०५(ए) अन्वये घरफोडीचा गुन्हा नोंदवला असून, आरोपीचा शोध सुरू केला आहे.
डॉ. आंबेडकर उद्यानासमोरून भरदिवसा मोटारसायकल लंपास
कळंब शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरून भरदिवसा अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे शहरात वाहनचोरांचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी आश्रुबा भिमराव गिरे (वय ३५, रा. ईटकुर) यांनी त्यांची होंडा स्प्लेंडर कंपनीची मोटारसायकल (क्र. एमएच २५ एई ०८६१) दि. ८ जुलै २०२५ रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास कळंब येथील डॉ. आंबेडकर उद्यानासमोरील रस्त्यावर उभी केली होती.
थोड्या वेळाने ते परत आले असता, त्यांना त्यांची अंदाजे २५,००० रुपये किमतीची मोटारसायकल जागेवर दिसली नाही. परिसरात शोधाशोध करूनही ती सापडली नाही. अखेर, त्यांनी दि. १३ जुलै २०२५ रोजी कळंब पोलीस ठाण्यात चोरी झाल्याची तक्रार दाखल केली.
त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.