उमरगा – एका २५ वर्षीय तरुणीला मदत करण्याच्या आणि जेवण देण्याच्या बहाण्याने रुमवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उमरगा शहरात उघडकीस आली आहे. ही घटना ८ ते १० मे २०२५ दरम्यान घडली असून, याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून उमरगा पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २५ वर्षीय तरुणी (नाव व गाव गोपनीय ठेवण्यात आले आहे) दि. ०८ मे २०२५ रोजी दुपारी ३ वाजल्यापासून ते दि. १० मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान तिच्या गावी जाण्यासाठी बसस्थानकावर थांबली होती. यावेळी एका तरुणाने तिला गाठले. त्याने तिला ‘जेवण देतो व मदत करतो’ असे आमिष दाखवून विश्वासात घेतले आणि तिला आपल्या खोलीवर नेले. त्या ठिकाणी नेल्यानंतर आरोपी तरुणाने पीडितेवर लैंगिक अत्याचार केला.
या गंभीर प्रकारानंतर पीडित तरुणीने धाडस दाखवत सोमवारी, दि. १२ मे २०२५ रोजी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ६४ (बलात्कार) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (अॅट्रॉसिटी) कायद्यातील कलम ३(१)(डब्ल्यू)(i)(ii) व ३(२)(v) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस या प्रकरणाचा गंभीरपणे तपास करत असून, आरोपी तरुणाचा कसून शोध घेण्यात येत आहे. पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून, तिला सर्वतोपरी सहकार्य केले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.