उमरगा – उमरगा शहरात भांडण करू नका, असे म्हटल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरुणावर दांडपट्ट्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश देवानंद भाले (रा. गाजी नगर पार्ट २, उमरगा) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. ११ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास धनलक्ष्मी कॉलनीच्या गेटसमोर ही घटना घडली. आरोपी आसिफ पठाण आणि सुरज दिनकर सुरवसे (दोघेही रा. उमरगा) हे आपसात भांडण करत होते. यावेळी फिर्यादी शैलेश भाले यांनी त्यांना “भांडण करू नका” असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
याचा राग आल्याने दोन्ही आरोपींनी शैलेश भाले यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाथाबुक्यांनी आणि दांडपट्ट्याने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले.
या घटनेनंतर शैलेश भाले यांनी १६ सप्टेंबर रोजी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी आसिफ पठाण आणि सुरज सुरवसे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, १२६(२), ११५(२), ३५२, आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






