धाराशिव – बीडीजी (BDG), दमन (Daman) आणि टीसी (TC) यांसारख्या ऑनलाईन गेमिंग ॲप्सच्या माध्यमातून अनेकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा रॅकेटचा धाराशिव सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. व्हॉट्सॲपवर लिंक पाठवून कमी पैशात जास्त परताव्याचे आमिष दाखवत या टोळीने अनेकांना ऑनलाइन जुगाराच्या जाळ्यात ओढले. या प्रकरणी बीड, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यातील पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून १ जानेवारी २०२५ पासून हा गोरखधंदा सुरू केला होता. ते लोकांना व्हॉट्सॲपद्वारे बंदी असलेल्या ऑनलाईन गेमिंग ॲप्सच्या लिंक पाठवायचे. यावर आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून त्यांना ऑनलाइन जुगार खेळायला लावून त्यांची आर्थिक फसवणूक करत होते.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश बापुराव कासुळे यांनी स्वतः फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून, पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. आरोपींची नावे:
- उत्तरेश्वर दामोदर इटकर (वय ४५, रा. सोनेसांगवी, जि. बीड)
- अस्लम दस्तगीर तांबोळी (वय ३२, रा. शेळका धानोरा, जि. धाराशिव)
- सुरज घाडगे (रा. सातेफळ, जि. बीड)
- नामदेव कांबळे (रा. अंबेजोगाई, जि. बीड)
- एम.डी. पाटील (रा. नांदेड)
या सर्वांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५), माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(सी), ६६(डी) आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या आंतरजिल्हा रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.