तुळजापूर – येथील काक्रंबा शिवारात असलेल्या कणे स्टोन स्केशर या खडी केंद्रातून २९ जुलै रोजी रात्री मोठी चोरी झाली. या चोरीत जॉब प्लेट, तीन लोखंडी चाळण्या, ट्रॅक्टर ट्रॉलीचे ॲक्सल, ट्रॅक्टर आणि टिपरचे फाळके, चॅनल, डबरु रोलर असा एकूण ४ लाख २२ हजार रुपये किमतीचा माल चोरीला गेला.
याप्रकरणी तुळजापूर पोलिसांनी स्वराज बाळासाहेब कांबळे (रा. हाडको) आणि राहुल विष्णु शिंदे (रा. मांतग नगर) या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा माल जप्त केला आहे. या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल सुनिल साठे, कुमार गुणवंत लोंढे, कुमार शंकर पौळ आणि दिनेश बब्रुवान कसबे (सर्व रा. मातंग नगर) यांच्यासह एकूण सहा जणांनी ही चोरी केली होती. चोरीच्या वेळी त्यांनी खडी केंद्राचे फिर्यादी अक्षय चंद्रकांत कणे आणि मॅनेजर दयानंद जगदाळे यांना दगडाने मारहाण करून गाडीच्या काचा फोडल्या होत्या.
या घटनेनंतर अक्षय कणे यांनी ३० जुलै रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३९० (२), २८१ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. सध्या पोलिस चोरीत सहभागी इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
उमरगा येथे वृद्धाच्या घरात चोरी, 50 हजारांचा ऐवज लंपास
उमरगा येथील मुन्शी प्लॉट परिसरात राहणाऱ्या 73 वर्षीय मगर भिमराव टिळे यांच्या घरात 29 जुलैच्या रात्री चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने असा एकूण 50 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.
30 जुलै रोजी सकाळी चोरीची माहिती मिळताच मगर टिळे यांनी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 380, 454 अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.