धाराशिव : “अमित शिंदे यांनी अगोदर आपला राजकीय ‘मालक’ निश्चित करावा, ते सध्या दादासोबत आहेत की ताईंच्या गटात, हे स्पष्ट करावे आणि मगच सामाजिक मुद्द्यांवर बोलावे,” असा जोरदार पलटवार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते पंकज पाटील यांनी माजी नगराध्यक्ष अमित शिंदे यांच्यावर केला आहे. शिंदे नेमके कोणाच्या सांगण्यावरून बोलत आहेत, याबद्दल आता शंका निर्माण झाली असल्याचेही पाटील म्हणाले.
अमित शिंदे यांनी नुकत्याच एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे शहरातील रस्ते कामांच्या निविदा प्रक्रियेवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना पंकज पाटील यांनी शिंदेंना अनेक प्रतिप्रश्न केले. पाटील म्हणाले की, “रस्त्यांच्या कामाचे श्रेय आमचे नाहीच, ते जनतेच्या लढ्याचे यश आहे, हे आम्ही आजवर सांगत आलो आहोत. मग मिरची झोंबायचं कारण काय?”
शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जादा दराने निविदा मंजूर न करण्याचा निर्णय झाल्याचे म्हटले होते. यावर पाटील म्हणाले की, “ही निविदा ८ मार्च २०२४ रोजी प्रसिद्ध झाली. मग आतापर्यंत ही निविदा का उघडण्यात आली नाही, याचे श्रेय राणा पाटील घेतील का? यावर अमित शिंदे यांनी बोलावे.”
बायोमायनिंग प्रकल्पावरूनही पाटील यांनी शिंदेंना घेरले. ते म्हणाले की, “बायोमायनिंगच्या बाजूने सभागृहात सर्वाधिक नगरसेवक राणा पाटील यांचेच होते. त्यावेळी तुम्ही (अमित शिंदे) सभागृहात नव्हता, पण आमच्या ताई ( सौ. वंदनाताई शिंदे ) होत्या, त्यांना विचारा. त्या कामात १७ टक्के अधिकची निविदा येऊनही तुम्ही विरोध का केला नाही? मग तुमचे हात ओले झाले नाहीत का? यावरही शिंदेंनी बोलावे.”
भुयारी गटार योजनेवरूनही पाटील यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला. “भुयारी गटार योजनेची मागणी तुमचे सध्याचे नेते (आणि म्हणूनच तुम्ही नेमके कोणाचे?) राणा पाटील यांनीच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. याबाबत तुम्ही अर्चनाताईंना विचारू शकता,” असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
एकंदरीत, पंकज पाटील यांनी अमित शिंदे यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर देत, शिंदे यांच्या राजकीय भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे धाराशिवमधील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.