मंडळी, ‘परंड्याचं ‘एमडी’ पुराण’ मालिकेतील आपल्या सततच्या पाठपुराव्याला आणि ‘धाराशिव लाइव्ह’ने उचललेल्या आवाजाला मोठे यश मिळताना दिसत आहे! आपण भाग ६ मध्ये ज्या लाल ब्रेझा गाडीच्या नंबर प्लेटच्या छेडछाडीबद्दल आणि FIR दाखल करण्याच्या जज साहेबांच्या आदेशानंतरही पोलिसांच्या दिरंगाईबद्दल वाचलं होतं, तसेच भाग ४ मधील ‘एम.डी.’ चे रूपांतर ‘कॅल्शियम क्लोराईड’ (चुना पावडर) मध्ये होण्याच्या अजब प्रकाराबद्दल जे प्रश्न उपस्थित केले होते, त्याचे ठोस परिणाम आता समोर येत आहेत.
‘धाराशिव लाइव्ह’चा दणका #१: ब्रेझा गाडी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल!
आठवतंय ती कहाणी? (भाग ६) आरोपी इम्रान शेखची जप्त केलेली, कोर्टाच्या आदेशाने सोडलेली, मस्तानच्या पंटरने वापरलेली आणि नंतर बार्शीतील कारवाईत पंटर सापडल्यावर गुपचूप कोर्टाच्या आवारात आणून लावलेली लाल ब्रेझा गाडी? जिच्या नंबर प्लेटसोबत (MH 46? बदलून MH 04?) उघडपणे छेडछाड झाली होती?
जज साहेबांनी आदेश देऊनही FIR दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या परंडा पोलिसांनी, अखेर ‘धाराशिव लाइव्ह’च्या सततच्या पाठपुराव्यानंतर आणि जनतेच्या वाढत्या दबावानंतर, या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे! हा उशिरा का होईना, पण कायद्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.
आणि यात अजून एक नवी माहिती समोर आली आहे – आमच्या गुप्त सूत्रांनुसार, ही गाडी कोर्टाच्या आवारात एका वकिलाने आणून लावली होती! त्यामुळे आता हा वकीलही पोलिसांच्या रडारवर आला आहे. गाडीचा नंबर बदलण्यामागे आणि ती कोर्टात लावण्यामागे या वकिलाची काय भूमिका होती, याचा तपास होणे आता गरजेचे आहे.
‘धाराशिव लाइव्ह’चा दणका #२: ‘कॅल्शियम क्लोराईड’ (चुना पावडर) प्रकरणाचा पुन्हा तपास होणार!
आता दुसरी मोठी बातमी! परंड्याच्या ‘एमडी’ पुराणाचा चौथा भाग आठवतोय? (FIR नं. १०/२०२४, १९ जानेवारी २०२४). जिथे १६ हजारांचे ‘एम.डी.’ पकडूनही लॅब रिपोर्टमध्ये ते ८ ग्रॅम ‘कॅल्शियम क्लोराईड’ झाल्याचा चमत्कार घडला होता? जिथे पोलिसांनी ‘गैरसमजूत’ झाली म्हणून केस बंद करायला काढली होती?
तर मंडळी, ऐका! ज्या परंडा पोलिसांनी स्वतःच ही केस ‘गैरसमजुतीने’ बंद करण्याची तयारी केली होती, त्याच परंडा पोलिसांनी आता स्वतःहून कोर्टाकडे अर्ज केला आहे की, त्यांना या केसचा ‘अधिक तपास’ (पुन्हा तपास) करायचा आहे!
‘धाराशिव लाइव्ह’ने विचारलेल्या प्रश्नांचा (‘८ ग्रॅम चुना पावडर कोण विकतं?’, ‘टेस्ट आधीच FIR का?’, ‘सॅम्पल बदललं कुणी?’) आणि जनतेच्या प्रतिक्रियांचा हा मोठा विजय आहे! पोलिसांना अखेर या प्रकरणातील गौडबंगाल मान्य करावे लागले आहे आणि पुन्हा तपासाची मागणी करावी लागली आहे.
पुढे काय?
‘धाराशिव लाइव्ह’ने प्रसिद्ध केलेल्या आठ भागांनंतर पोलीस प्रशासनावर दबाव वाढला असून, दोन महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये हालचाल सुरू झाली आहे. आता जनतेचे लक्ष याकडे असेल की:
- ब्रेझा गाडीच्या नंबर प्लेट छेडछाड प्रकरणी दाखल झालेल्या FIR चा तपास निःपक्षपातीपणे होईल का? त्या वकिलाची भूमिका समोर येईल का?
- ‘कॅल्शियम क्लोराईड’ प्रकरणाचा ‘अधिक तपास’ खरोखरच सखोलपणे केला जाईल का? सॅम्पल बदलण्यामागे कोण होते, हे उघड होईल का?
‘धाराशिव लाइव्ह’चा पाठपुरावा सुरूच राहील. बघूया, या पुराणाचे पुढचे अध्याय काय उलगडतात!