परंडा: परंडा तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. शेतात जनावरांना चारा-पाणी करण्यासाठी गेलेल्या एका २२ वर्षीय तरुणीवर गावातीलच एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित तरुणी आपल्या शेतात जनावरांना चारा आणि पाणी देण्यासाठी गेली होती. त्यावेळी गावातीलच एका तरुणाने शेतात येऊन तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.
केवळ अत्याचारच नाही, तर आरोपीने पीडितेस शिवीगाळ करत, “तुला कोठे जायचे आहे तेथे जा,” अशी धमकीही दिली. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित तरुणीने तात्काळ परंडा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.
पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून परंडा पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४ (१) (बलात्कार), ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे) आणि ३५१ (२) (गुन्हेगारी धमकी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.






