परंडा: धाराशिव जिल्ह्यातील परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २४ वर्षीय तरुणीवर तिघांनी वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या दिवशी बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका नराधमाने तरुणीला मॅंगो ज्यूसमध्ये गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला आणि त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण (व्हिडिओ) करून ब्लॅकमेल केले. तर त्यानंतर अन्य दोघांनीही तरुणीच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात तिन्ही नराधमांविरुद्ध अॅट्रॉसिटी आणि बलात्काराचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पीडित तरुणीच्या कायदेशीर सुरक्षेचा आणि गोपनीयतेचा विचार करता पोलिसांनी तिचे नाव आणि गाव गुप्त ठेवले आहे.
मॅंगो ज्यूसमध्ये गुंगीचे औषध देऊन पहिल्या नराधमाचा अत्याचार
परंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भयंकर घटना २५ मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सुरू झाली. पीडित २४ वर्षीय तरुणी तिच्या घरी एकटीच असताना, गावातील एका तरुणाने ‘मोबाईल चार्जिंगला लावणे’ या बहाण्याने तिच्या घरात प्रवेश केला. त्याने पीडितेला पिण्यासाठी मॅंगो ज्यूस दिला. या ज्यूसमध्ये गुंगीचे औषध मिसळले असल्याने, ते पितातच तरुणीला तीव्र झोप लागली आणि ती बेशुद्ध झाली.
तरुणी शुुद्धीवर नसल्याचा गैरफायदा घेऊन या पहिल्या नराधमाने तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. एवढ्यावरच न थांबता त्याने या कृत्याचे आपल्या मोबाईलमध्ये छायाचित्रीकरण (व्हिडिओ आणि फोटो) केले. तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिने प्रतिकार केला असता, “हा प्रकार जर कोणालाही सांगितला, तर तुझे हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनाम करेन,” अशी थेट धमकी आरोपीने दिली.
ब्लॅकमेल करत दुसऱ्या आणि तिसऱ्या आरोपीनेही केला बलात्कार
पहिल्या घटनेच्या धक्क्यातून पीडित तरुणी सावरत नाही, तोच दि. २९ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गावातीलच दुसऱ्या एका तरुणाने ती घरी एकटी असल्याचे पाहून घरात घुसखोरी केली. त्यानेही तरुणीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.
त्यानंतर बुधवार, दि. ३ जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास गावातील तिसऱ्या एका तरुणाने पीडित तरुणीला भीती दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध स्वतःच्या घरी नेले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या लागोपाठ झालेल्या भयानक छळामुळे पीडितेची मानसिक आणि शारीरिक प्रकृती खालावली होती. अखेर तिने अत्यंत धैर्याने आपल्या कुटुंबाला हा सर्व प्रकार सांगितला आणि पोलीस ठाणे गाठले.
३ जणांवर अॅट्रॉसिटी आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंद
या गंभीर प्रकारानंतर पीडित तरुणीने शुक्रवार, दि. ५ जून रोजी परंडा पोलीस ठाण्यात हजर राहून तिन्ही नराधमांविरुद्ध अधिकृत तक्रार दिली. तिच्या प्रथम खबरीवरून (FIR) पोलिसांनी गावातील तीन संशयित तरुणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(१), ६४(२) (बलात्कार), ७७, १२३, ३३३, ३५१(२) (गुन्हेगारी धमकी) सह ‘अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा’ (Atrocity Act) कलम ३(२)(va) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथके रवाना:
महिला अत्याचाराच्या या अत्यंत संवेदनशील आणि गंभीर गुन्ह्याची दखल वरिष्ठ पोलीस प्रशासनाने घेतली आहे. पीडितेवर जातीवाचक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग झाल्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक (DySP) दर्जाचे वरिष्ठ अधिकारी करत आहेत. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच तिन्ही आरोपी फरार झाले असून, त्यांना तात्काळ अटक करण्यासाठी पोलिसांची विशेष शोध पथके रवाना करण्यात आली आहेत.





