परंडा – परंडा शहर आणि तालुक्यात नुकत्याच उघडकीस आलेल्या तुळजापूर प्रकरणापेक्षाही मोठे एमडी ड्रग्जचे रॅकेट कार्यरत असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे नेते व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केला आहे. या रॅकेटची पाळेमुळे खणून काढून सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी, यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी परंडा येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरण राज्यभर गाजत असताना, परंडा शहरातील काही जणांना या प्रकरणात अटक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर श्री. ठाकूर यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “मी सोलापूर आणि धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांच्या संपर्कात आहे. परंड्यातील ड्रग्ज रॅकेट हे तुळजापूरपेक्षाही मोठे असण्याची शक्यता आहे. या प्रकरणात कोणीही दोषी आढळल्यास, मग तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी असो, त्याची गय केली जाणार नाही.”
या प्रकरणातील आरोपींची बँक खाती तातडीने गोठवण्यात यावीत आणि मुख्य सूत्रधाराला (म्होरक्याला) अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत, असेही ठाकूर यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांना भेटून या प्रकरणाची सविस्तर माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
परंड्यातील ९ जणांवर गुन्हा, ३ फरार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परंडा ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत परंड्यातील ९ जणांना आरोपी करण्यात आले आहे. यामध्ये असद हसन देशमुख, मेहफूज महेमद शेख, वसीम इसाक बेग, जावेद नवाबुद्दीन मुजावर, हसन फक्रस, दीपक काळे, साजिद चाँद मुजावर, फिरोज उर्फ मस्तान रसूल शेख व शेळके यांचा समावेश आहे. यापैकी जावेद मुजावर, फिरोज शेख व शेळके हे तिघे अद्याप फरार आहेत. याशिवाय, बार्शी येथील अय्याज शौकत शेख, जमीर असगर पटेल व सिरफराज उर्फ गोल्डी अस्लम शेख या तिघांचाही आरोपींमध्ये समावेश आहे.
या पत्रकार परिषदेला किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅड. संतोष सूर्यवंशी, अॅड. जहीर चौधरी, तालुकाध्यक्ष अरविंद रगडे, समरजितसिंह ठाकूर आदी उपस्थित होते.