परंडा मतदारसंघात निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारार्थ आज सभा आयोजित केली गेली होती, आणि मंचावर खास आकर्षण म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उबाठा) खासदार ओमराजे निंबाळकर. दोघांची उपस्थिती आणि संवादाने संपूर्ण सभा जोशात रंगली होती.
सभेला सुरुवात होताच ओमराजे निंबाळकर माईकवर आले आणि थोडं मिश्कीलपणे म्हणाले, “माझे आदरणीय शरद पवार साहेब, तुमचं व्यक्तिमत्व आणि ताकद बघून मी तर मंत्रमुग्ध होतो. तुमच्या नेतृत्वाखाली असताना मला शिकायला खूप काही मिळालंय. १६ वर्षाच्या तरुणालाही लाजवेल असं तुमचं जोशपूर्ण व्यक्तिमत्व आहे. इतक्या वयातही तुम्ही फिरता आहात, लढा देता आहात. साहेब, तुमचं वय जरी ८४ असलं तरी तुमच्या उत्साहाला वयाचं बंधन नाही असंच वाटतं. तुम्ही आमचं मार्गदर्शन करत राहा!”
शरद पवार साहेबांसारख्या अनुभवी नेत्याला ओमराजेंचं हे कौतुक अगदीच खट्याळ वाटलं. पवार साहेबांनी माईक हातात घेतला आणि एका मिश्किल हसण्यासह उत्तर दिलं, “ओमराजे, तुझं वक्तव्य भारीच झालं! पण मला एक सांग, मी काय म्हातारा दिसतोय का तुला? इथे एक म्हातारा दुसऱ्याच्या खांद्यावर बसून आला असं तुला वाटतंय का? मी कुणाच्या पाठीवर चढून येत नाही; मी स्वतःच्या पायांवर चालतोय, आणि सरकार बदलल्याशिवाय म्हातारा होणार नाही, हे ठरलंय!”
सभेत एकच हशा पिकला. श्रोतेसुद्धा पवार साहेबांच्या या फटकाऱ्यावर फिदा झाले. ओमराजेही थोडे गोंधळले पण लगेच स्वतःला सावरत म्हणाले, “साहेब, अहो, मी तुमचं कौतुक केलं, तुमच्या जोमाचं कौतुक केलं. तुम्ही म्हातारे होणं शक्यच नाही. तुम्ही चिरंजीवी आहात असंच आम्हाला वाटतंय!”
शरद पवारांनी डोळ्यांत चमक आणत पुन्हा मिश्कीलपणे उत्तर दिलं, “आणि हे चिरंजीव काय म्हणतात हो ओमराजे, आमच्या मतदारांनाही हेच वाटतं का बघावं लागेल. पण सांगू का, इथं एक गोष्ट निश्चित आहे. सरकार बदलल्याशिवाय माझी इच्छा तरी म्हणायची म्हातारपणाच्या वाटेवर जायची नाही. हे सरकार काढून टाकायचंय; मग थोडं थांबायला हरकत नाही!”
ओमराजेंचा चेहरा थोडा रंगला, पण सभेतल्या लोकांच्या हसण्याने आणि उत्साहाने सगळं हलकंफुलकं झालं. ओमराजे काही कमी नव्हते, त्यांनी थोडंसं चेष्टेत उत्तर दिलं, “साहेब, माझं म्हणणं असं आहे, मतदारांची प्रतिक्रिया कशी असेल ते २३ तारखेला बघितल्याशिवाय ठरवता येणार नाही.
सुरुवातीला ऐनवेळी उमेदवारी कटलेले रणजित पाटील यांनी , विरोधी उमेदवार तानाजी सावंत यांना बुक्का लावा, असे सांगितले. आता मतदार कुणाला बुक्का लावणार आणि कुणाला थुक्का लावणार हे निवडणूक निकालाच्या दिवशी कळणार आहे.” तीन वेळा निवडून आलेल्या मोटे यांना २०१९ साली सावंताकडून थोडा झटका बसला, पण यावेळी त्यांच्या अंगात ‘बुक्क्याची’ ताकद आहे, असं सर्वाना वाटत आहे.
रणजित पाटील यांच्या भाषणामुळे एकच उत्साह उफाळून आला. लोकांचं हसू आणि टाळ्यांचा गजर याने सभेत वातावरण रंगतं गेलं. पवार साहेब आणि ओमराजेंच्या या मिश्किल संवादाने श्रोत्यांची मने जिंकली आणि निवडणुकीचा माहोल अगदीच उत्साहात रंगला.
शेवटी सभा संपली, पण परंडाच्या या धमाल संवादांनी सगळ्यांच्या मनात घर केलं. पवार साहेब आणि ओमराजेंची ही जुगलबंदी बघायला श्रोते उत्सुक होते, आणि सगळेच मनात हसत-हसत घरी गेले.
– बोरूबहाद्दर