परंडा: “आम्ही आर्थिक अडचणीत आहोत,” असे कारण पुढे करत एका ६९ वर्षीय वृद्धाकडे तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार परंडा शहरात उघडकीस आला आहे. पैसे दिले नाहीत तर मुला-सुनेसह मुलीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून, याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर दयानंद तिवारी आणि आनंद दयानंद तिवारी (दोघे रा. शिक्षक सोसायटी, परंडा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दिपक द्वारकाप्रसाद तिवारी (वय ६९, रा. सर्वे नं. ४५, कुर्डुवाडी रोड, परंडा) यांनी तक्रार दिली आहे.
ही घटना ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आणि त्यानंतर वेळोवेळी घडली. आरोपींनी फिर्यादी दिपक तिवारी यांना वारंवार फोन करून पैशांची मागणी केली. आरोपींनी फिर्यादीला धमकावताना सांगितले की, “आम्ही आर्थिक अडचणीत आहोत, आम्हाला १० लाख रुपये द्या.” जर ही रक्कम दिली नाही, तर तुमचा मुलगा, मुलगी आणि सून यांना जीवे मारू, अशी गंभीर धमकी आरोपींनी दिली.
या सततच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून अखेर दिपक तिवारी यांनी गुरुवारी (दि. ४ डिसेंबर) परंडा पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अमर तिवारी आणि आनंद तिवारी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३, ३०८(२)(४), ३५१(२)(४) आणि ३(५) अन्वये खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.






