परंडा : सुनेच्या बहिणीने लग्नास दिलेला नकार आणि जुन्या भांडणाचा राग मनात धरून एकाच कुटुंबातील चौघांना लोखंडी गज आणि दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील कुंभेफळ येथे घडली आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात एका महिलेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मोहराबाई श्रीधर आवाळे (वय ५५, रा. कुंभेफळ) यांनी १ जुलै २०२५ रोजी परंडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २९ जून रोजी सायंकाळी ७ ते ७:३० च्या सुमारास कुंभेफळ गावात घडली. फिर्यादी मोहराबाई यांच्या सुनेच्या बहिणीने आरोपीच्या कुटुंबातील लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता. याच कारणावरून आणि पूर्वीच्या भांडणातून वाद उफाळून आला.
आरोपी सोन्या दादा आवाळे, सुशांत दादा आवाळे, दादा बाबु आवाळे, उमेश वसंत आवाळे आणि संगीता दादा आवाळे (सर्व रा. कुंभेफळ) यांनी गैरकायदेशीर जमाव जमवून मोहराबाई यांचा मुलगा संतोष आवाळे, पुतणे बाळू आवाळे व प्रदीप आवाळे आणि नातू पृथ्वीराज आवाळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्या, लोखंडी गज आणि दगडाने मारहाण केली. या हल्ल्यात चौघेही जखमी झाले.
मोहराबाई आवाळे यांच्या फिर्यादीवरून परंडा पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.