परंडा : शेत रस्त्याच्या जुन्या वादातून एका ३० वर्षीय तरुणाला आणि त्याच्या वडिलांना कोयता, लोखंडी गज व काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना परंडा तालुक्यातील कारंजा येथे घडली आहे. या हल्ल्यात तरुणाच्या वडिलांच्या खिशातील अडीच हजार रुपयेही जबरदस्तीने काढून घेण्यात आले. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बापु भारत घोडके (वय ३०, रा. कारंजा, ता. परंडा) असे फिर्यादीचे नाव आहे. किसन चंद्रकांत गोरे, दत्ता चंद्रकांत गोरे, दत्ता जालींदर गुटाळ आणि बापु मिटु गोरे (सर्व रा. कारंजा) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. ३ जुलै २०२५) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बापु घोडके हे कारंजा गावात असताना, आरोपींनी त्यांना शेत रस्त्याच्या कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी संगनमत करून बापु घोडके यांना लाथाबुक्क्यांनी, कोयता, लोखंडी गज आणि काठीने जबर मारहाण केली, ज्यात ते गंभीर जखमी झाले.
दरम्यान, भांडणाचा आवाज ऐकून बापु यांचे वडील भांडण सोडवण्यासाठी मध्ये आले असता, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी आरोपींनी त्यांच्या वडिलांच्या खिशातील २,५०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि दोघांनाही जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर बापु घोडके यांनी परंडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ११८(१), ११९(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.