परंडा – तालुक्यात कृषी साहित्याच्या चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, सिरसाव शिवारात दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून अज्ञात चोरट्यांनी एक सोलार मोटार आणि एकूण ४५० फूट केबल चोरून नेल्याची घटना घडली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे २२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना १ ऑगस्टच्या रात्री ते २ ऑगस्टच्या सकाळच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी शेतकरी रुपेश रामराव चोबे (वय ३७, रा. सिरसाव, ता. परंडा) यांनी परंडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश चोबे यांची सिरसाव शिवारात गट क्रमांक १५१ आणि १४९ मध्ये शेती आहे. या शेतातील एम-टेक कंपनीची सोलार मोटार आणि तिला जोडलेली ३०० फूट केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. त्याचबरोबर, जवळच असलेल्या पांडुरंग जनार्धन चोबे यांच्या विहिरीवरील १५० फूट केबलही चोरट्यांनी कापून नेली. दोन्ही मालाची एकूण किंमत २२,००० रुपये आहे.
शेतात सिंचनासाठी महत्त्वाचे असलेले साहित्य चोरीला गेल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. रुपेश चोबे यांनी सोमवारी (दि. ४ ऑगस्ट) रोजी परंडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वारंवार होणाऱ्या अशा चोऱ्यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
धाराशिव शहरातील बालाजी नगरात घरफोडी
धाराशिव – शहरात बंद घरे फोडून होणाऱ्या चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, बालाजी नगर भागातील एक बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील दहा हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. ही घटना ३१ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान घडली.
याप्रकरणी अशोक सुभाष चव्हाण (वय ३७, रा. बालाजी नगर, धाराशिव) यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अशोक चव्हाण हे कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. ३१ जुलै रोजी दुपारी ३ वाजल्यापासून ते २ ऑगस्टपर्यंत त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेली १०,००० रुपयांची रोख रक्कम चोरून चोरटे पसार झाले.
सोमवारी (दि. ४ ऑगस्ट) रोजी अशोक चव्हाण यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४), ३३१(३) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.