परंडा: दारू उधार देण्याच्या कारणावरून वाद घालत चौघांनी मिळून एकाला लाथाबुक्क्यांनी आणि बिअरच्या क्रेटने मारहाण केल्याची घटना परंडा शहरातील लोकप्रिय बिअर बारमध्ये घडली आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बत्तीनी लक्ष्मण गौड (वय ४९, रा. नरसिंग नगर, परंडा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजेच्या सुमारास परंडा येथील ‘लोकप्रिय बिअर बार’ मध्ये घडली. आरोपींनी फिर्यादी बत्तीनी गौड यांच्याकडे उधार दारूची मागणी केली. यावरून झालेल्या वादातून आरोपींनी गौड यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी गौड यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तेथे असलेल्या बिअरचे क्रेट (Carrot) आणि काठीने डोक्यात व शरीरावर मारून गंभीर जखमी केले. यावेळी आरोपींनी फिर्यादीला जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.
बत्तीनी गौड यांनी १६ जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या तक्रारीवरून परंडा पोलीस ठाण्यात खालील आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे:
१. विश्वास उर्फ बापू अंकुश भानवसे २. अशोक मच्छिंद्र भानवसे ३. महेश मच्छिंद्र भानवसे ४. रोहीत विश्वास भानवसे
(सर्व रा. काशीमबाग, परंडा, जि. धाराशिव)
पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.




