परंडा: परंडा ते कुर्डुवाडी मार्गावर सोमवारी (दि. ७) सायंकाळी ७.३० वाजता एका सराफ व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी विना क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओने दुचाकीला धडक देऊन आणि डोळ्यात चटणी फेकून ३ लाख ९७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली बॅग हिसकावून नेली.
तालुक्यातील कारंजा येथील रहिवासी असलेले दशरथ गोरे यांचे परंडा शहरात सद्गुरू ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. सोमवारी सायंकाळी ते दुकान बंद करून आपल्या दुचाकीने गावाकडे निघाले होते. त्यांच्या बॅगेत ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ४७ हजार रुपयांची रोकड होती.
शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असताना, मागून आलेल्या एका विना क्रमांकाच्या पांढऱ्या स्कॉर्पिओने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर, गाडीतून उतरलेल्या चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावून घेतली व कुर्दुवाडीच्या दिशेने पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच दशरथ गोरे यांनी घरी आणि सराफ असोसिएशनला संपर्क केला, त्यानंतर सराफ व्यापारी अभिजित पेडगावकर यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस निरीक्षक दिलीपकुमार पारेकर यांनी तातडीने तीन पोलिस पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी कुर्दुवाडी, करमाळा, आणि रोपळे या मार्गांवर रवाना केली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने राबवलेल्या शोध मोहिमेदरम्यान, माढा तालुक्यातील बारलोणी परिसरात पोलिसांना एक संशयित विना नंबरची स्कॉर्पिओ गाडी आढळून आली. पोलिसांनी ही गाडी चौकशीसाठी ताब्यात घेतली आहे.