परंडा: शेतजमिनीच्या वादातून गैरकायद्याची मंडळी जमवून एका तरुणाला व त्याच्या वडिलांना शिवीगाळ करत, लाथाबुक्यांनी, बांबूने आणि लाईटच्या केबलने मारहाण केल्याची घटना परंडा तालुक्यातील टाकळी येथे घडली आहे. इतकेच नव्हे तर, आरोपींनी पीडितांवर चटणी फेकून त्यांना जखमी केले व जिवे ठार मारण्याची धमकीही दिली.
याप्रकरणी ज्ञानेश्वर रामभाऊ भोरे (वय ३० वर्षे, रा. टाकळी, ता. परंडा) यांनी परंडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास टाकळी येथील शेत गट क्र. ११७ मध्ये घडली. फिर्यादी ज्ञानेश्वर भोरे व त्यांचे वडील शेतात असताना, आरोपी ईश्वर भाऊराव भोरे, गणपती भाऊराव भोरे, ब्रम्हदेव भोरे, ऋषीकेश भोरे, माउली भोरे आणि कृष्णा भोरे (सर्व रा. टाकळी) यांनी जमिनीच्या वादाच्या कारणावरून एकत्र जमून फिर्यादी व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यानंतर, आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या वडिलांना लाथाबुक्यांनी, बांबूने व लाईटच्या केबलने मारहाण केली. यावेळी आरोपींनी त्यांच्यावर चटणी टाकून त्यांना जखमी केले आणि ‘तुम्हाला जिवे ठार मारू’ अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ज्ञानेश्वर भोरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून, परंडा पोलिसांनी वरील सहा आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १९१(२), १९१(३), १९०, ३५२, ३५१(२), ११८(१) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.






