मंडळी, परंड्याच्या ‘एमडी’ पुराणाच्या चौथ्या सिझनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत! मागच्या भागात आपण ‘मस्तान भाई‘ची कुंडली बघितली – झोपडपट्टी दादा ते म्होरक्या, गांजा ते ड्रग्ज पेडलर, हॉटेल बॉय ते मस्तान भाई ! आणि हे सगळं कसं घडलं? तर आपले धाराशिव LCB चे ‘ते’ इन्स्पेक्टर साहेब जेव्हा परंड्यात होते, तेव्हाच्या ‘आशीर्वादाची’ (आणि ‘मलई’, ‘अंड्यां’ची!) चर्चा तर आपण ऐकलीच.
आता ऐका अजून एक किस्सा, जेव्हा साहेब परंड्यात ‘धृतराष्ट्र’ बनले होते!
म्हणे, साहेब परंड्यात असताना अवैध धंद्यांना ऊत आला होता, पण साहेबांनी डोळ्यांवर काळी पट्टी बांधली होती. का? कारण त्यांचा ‘लाडका’ मस्तान शेख उर्फ मस्तान भाई हा त्यांचा ‘भाई’ झाला होता! तो त्यांना म्हणे एकदम ‘गरीब बिचारा’ वाटायचा! (आता आलिशान गाड्यामध्ये रील बनवताना , पैसे उधळताना ‘गरीब’ वाटतो का, हा प्रश्नच आहे!)
तर घडलं असं की… (कहाणी में नया ट्विस्ट!)
परंडा म्हणजे जणू मस्तान भाईचं राज्य! पण या राज्यात पुण्याहून आलेल्या एका ड्रग्ज पेडलरने घुसखोरी केली. तो पठ्ठ्या मस्तान भाईच्या परवानगीशिवाय, परस्पर एम.डी. विकायला लागला! आता आपल्या ‘राज्यात’ दुसरा कोणी येऊन धंदा करणार म्हटल्यावर मस्तान भाईला राग येणारच!
मग काय, भाईने डोक्याची नस दाबली आणि थेट पोलिसांनाच टीप दिली! (बघा, प्रतिस्पर्ध्याला संपवायला पण सिस्टमचा कसा वापर!). पोलिसांनी कारवाई केली, माल पकडला. पण… इथेच तर खरी गंमत आहे! पुढे म्हणे ‘तोडपाणी’ झालं आणि सगळा मामला सेट झाला!
आणि मग सुरू झाला केमिकल लोचा!
अधिकृत कागदपत्रांनुसार (पोलीस रेकॉर्ड म्हणतात):
- तारीख: १९ जानेवारी २०२४
- घटना: इम्रान नजीर शेख नावाच्या माणसाकडे ८.३३ ग्रॅम ‘एम.डी.’ (किंमत १६,००० रु.) सापडलं.
- गुन्हा: परंडा पोलीस ठाण्यात FIR नं. १०/२०२४, NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल. इम्रानला अटक.
- नवीन आरोपी: तपासात अन्वर उर्फ आण्णा जलील अत्तारचं नाव आलं. त्याला अटक झाली (पण कधी? तब्बल सहा महिन्यांनी!)
- प्रयोगशाळेचा निकाल: पकडलेला माल तपासणीसाठी छ. संभाजीनगरच्या लॅबमध्ये पाठवला. आणि रिपोर्ट काय आला? तर म्हणे, त्यात Mephedrone (MD) नाहीच! मग काय आहे? तर Calcium Chloride! (अहो, ते शेतकरी शेतात वापरतात ते!)
- केस क्लोज: मग काय, पोलिसांनी सांगितलं, “अहो, आमची गैरसमजूत झाली!” आणि ‘क’ वर्ग समरीसाठी (म्हणजे केस बंद करण्यासाठी) कोर्टात प्रस्ताव पाठवला! (विशेष म्हणजे, आण्णाला अटक केल्यावर फक्त आठ दिवसांत!)
आता यावर काही प्रश्न तर पडणारच ना राव!
- कॅल्शियम क्लोराईड शेतकरी किलोमध्ये वापरतात, मग या आरोपीकडे फक्त ८.३३ ग्रॅम कसं काय सापडलं? कोणी पुडीत विकतं का ते? विशेष म्हणजे आरोपी इम्रान नजीर शेख हा शेतकरीही नाही, मग तो कोणती शेती करीत होता ?
- जर ते कॅल्शियम क्लोराईडच होतं, तर आधी टेस्ट न करता NDPS सारख्या गंभीर कायद्याखाली गुन्हा दाखल करायची पोलिसांना इतकी घाई का झाली होती?
- आरोपी आण्णाला सहा महिन्यांनी अटक करायची आणि अटक केल्यावर आठ दिवसांत केस बंद करायचा प्रस्ताव द्यायचा? हा कुठला तपास?
- आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न: एका होमगार्डमार्फत पाठवलेलं ते ‘एम.डी.’चं सॅम्पल लॅबपर्यंत पोहोचताना ‘कॅल्शियम क्लोराईड’ कसं झालं? कुणी बदललं ते?
म्हणूनच मागणी जोर धरतेय!
या प्रकरणाची राज्य सरकारने विशेष पथक नेमून सखोल चौकशी करावी. तरच कळेल की नक्की काय शिजलं होतं! खरंच गैरसमजूत झाली होती की ‘समजूत’ घातली गेली होती?
तात्पर्य काय?
‘मस्तान भाई’ फक्त स्वतःच धंदा करत नव्हता, तर म्हणे प्रतिस्पर्ध्यांना संपवण्यासाठी पण पोलिसांचा (आणि नंतर सिस्टमचा?) वापर करत होता? आणि त्याकाळात परंड्यात बसलेले (आणि आता LCB त असलेले) साहेब खरंच ‘धृतराष्ट्र’ होते की या सगळ्या खेळाचे दिग्दर्शक?
हे ‘कॅल्शियम क्लोराईड’ प्रकरण तर हिमनगाचं टोक नसेल ना? अजून किती ‘एम.डी.’चं ‘कॅल्शियम क्लोराईड’ झालं असेल?
बघूया, चौकशी होते का आणि ‘दूध का दूध, पाणी का पाणी… की कॅल्शियम क्लोराईड का क्लोराईड’ होतंय ते! तोपर्यंत, परंड्याचं ‘एमडी’ पुराण सुरूच! 😉