परंडा – परंडा पोलीस ठाण्यात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी पाच महिन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी घरी एकटी असताना गावातीलच एका तरुणाने तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. ही घटना अंदाजे नऊ महिन्यांपूर्वीपासून ते १९ एप्रिल २०२५ पर्यंत घडली. या अत्याचारात ती पाच महिन्यांची गर्भवती झाली. याबद्दल कोणाला सांगितल्यास आई-वडिलांना जिवे ठार मारण्याची धमकी आरोपीने दिल्याने पिडीत मुलीने सुरुवातीला याबद्दल कोणालाही सांगितले नाही.
२२ मे २०२५ रोजी पिडीत मुलीने दिलेल्या प्रथम खबरेवरून परंडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ६५(१), ६४(२)(एफ), ६४(२)(एच), ६४(२)(एम), ३५१(३) सह पोक्सो कायदा कलम ६, १०, १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
लोहाऱ्यात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
लोहारा – लोहारा पोलिस ठाण्यात एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातीलच एका तरुणाने प्रेमाचे नाटक करत हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ मे २०२५ रोजी सकाळी ११ ते २२ मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजेदरम्यान ही घटना घडली. गावातील एका तरुणाने १३ वर्षीय पिडीत मुलीला “माझे तुझ्यावर प्रेम आहे” असे सांगून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपी पिडीतेला घेऊन जात असताना तो पकडला गेला.
या घटनेनंतर, २२ मे २०२५ रोजी पिडीत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून लोहारा पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(आय), ६४(२)(एम), ६५(१), १३७(२) सह पोक्सो कायदा कलम ४, ६ तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१), (डब्ल्यू)(i)(ii) आणि ३(२)(व्ही) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, लोहारा पोलीस पुढील तपास करत आहेत.