परंडा : “आमच्याकडे रागाने का पाहतो?” एवढ्याशा कारणावरून एका टोळक्याने गैरकायदेशीर जमाव जमवून चौघांना शिवीगाळ करत चाकू, लोखंडी गज, काठी आणि दगडाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना परंडा तालुक्यातील कौडगाव येथे घडली आहे. या हल्ल्यात चौघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे. याप्रकरणी ११ जणांविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोरख अंबऋषी देवकर (वय ३६, रा. कौडगाव, ता. परंडा) हे दिनांक १२ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कौडगाव येथील आण्णा बरकडे यांच्या घराजवळ असताना, आरोपी लक्ष्मण ऋषीकेश ठवरे, रंजित रामचंद्र ठवरे, राज अशोक ठवरे, भालचंद्र भागवत ठवरे, अशोक भागवत ठवरे, रामभाऊ ऋषीकेश ठवरे, किरण रामचंद्र ठवरे, गणेश अशोक ठवरे, रामचंद्र भागवत ठवरे, खंडू तात्याबा देवकर आणि रोहन रामा पारेकर (सर्व रा. कौडगाव) यांनी त्यांना अडवले.
“तू आमच्याकडे रागाने का पाहतो?” असे म्हणत आरोपींनी गोरख देवकर तसेच त्यांचे नातेवाईक नागेश भिसे, ब्रह्मदेव भिसे आणि प्रशांत तरंगे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या सर्वांनी गैरकायदेशीर जमाव जमवून लाथाबुक्क्यांनी, चाकू, लोखंडी गज, काठी व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच, जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे गोरख देवकर यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
गोरख देवकर यांनी १४ मे २०२५ रोजी परंडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून, पोलिसांनी वरील ११ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(२) (घातक शस्त्रासह दंगा करणे), ११५(२) (समान उद्देशाने जमलेल्या जमावातील प्रत्येकास गुन्ह्यासाठी दोषी धरणे), ३५२, ३५१(२) (जीवे मारण्याची धमकी), १८९(२) (गैरकायदेशीर जमाव जमवणे), १९१(२), १९१(३) (घातक शस्त्रांसह दंगा), १९० (दंगा) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. परंडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे कौडगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.