परंडा: लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला परंडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तालुक्यातील खासगाव शिवारात बुधवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपीकडून २५ हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त केले असून, त्याच्यावर शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रमेश महादेव यादव (वय ३१ वर्षे, रा. खासगाव, ता. परंडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
परंडा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास खासगाव येथील शिंदे यांच्या शेतातून जाणाऱ्या रस्त्याने एक व्यक्ती विनापरवाना पिस्तूल घेऊन फिरत होता. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी आरोपी रमेश यादव हा संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ २५,००० रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल सापडले.
पोलिसांनी पिस्तूल जप्त करून रमेश यादव याला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस अंमलदार शिवाजी राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात आरोपी रमेश यादव विरोधात भारतीय शस्त्र कायदा कलम ३, २५, २७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीने हे पिस्तूल कुठून आणले आणि त्याचा उद्देश काय होता, याचा अधिक तपास परंडा पोलीस करत आहेत.