परंडा : परंडा पोलिसांनी एक मोठी कारवाई करत कत्तलीच्या उद्देशाने केली जाणारी ३५ गोवंशीय वासरांची वाहतूक रोखली आहे. अत्यंत निर्दयीपणे दाटीवाटीने कोंबून नेत असलेल्या या वासरांची सुटका करण्यात आली असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या कारवाईत वाहन आणि वासरांसह एकूण ४ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही घटना सोमवारी, दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास परंडा-बावची रस्त्यावर महात्मा गांधी शाळेजवळ घडली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, एका पिकअप वाहनामधून (क्र. एमएच ०८ डब्ल्यू ५००८) गोवंशीय प्राण्यांची अवैध वाहतूक होत होती. पोलिसांनी सापळा रचून हे वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यात ३५ गोवंशीय वासरे अतिशय क्रूर अवस्थेत आढळून आली. त्यांचे तोंड आणि पाय बांधलेले होते, त्यांना क्षमतेपेक्षा जास्त दाटीवाटीने कोंबले होते आणि चारा-पाण्याची कोणतीही सोय केली नव्हती.
पोलिसांनी तात्काळ वाहनातील आरोपी अतुल किसन बागल (वय ३२, रा. साडे, ता. करमाळा, जि. सोलापूर) आणि दिनेश लक्ष्मण चव्हाण (वय १९, रा. केम, ता. करमाळा, जि. धाराशिव) यांना ताब्यात घेतले.
याप्रकरणी पोलिसांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद देऊन दोन्ही आरोपींविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम, प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्याचे परिवहन नियमांतील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. परंडा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.