परंडा – परंडा ते बार्शी जाणाऱ्या रोडवर गोवंशीय जनावरांच्या मांसाची अवैध वाहतूक करणाऱ्या बोलेरो गाडीवर परंडा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १ लाख ५९ हजार रुपये किमतीचे ७९५ किलो मांस जप्त केले असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १८) सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास परंडा ते बार्शी रोडवरील ब्रह्मगाव शिवारात ही कारवाई करण्यात आली. बोलेरो गाडी (क्रमांक एमएच २० बी.वाय. ९१७७) मधून गोवंशीय जनावरांच्या मांसाची विक्रीसाठी वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गाडी अडवून तपासणी केली असता, त्यात ७९५ किलो गोवंशीय मांस आढळून आले.
याप्रकरणी आरोपी सलमान अमर सय्यद (वय ३०, रा. जुनी तहसील जवळ, परंडा) आणि अफजल मंजूर कुरेशी (रा. दर्गा रोड, परंडा) या दोघांविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी १ लाख ५९ हजार रुपये किमतीचे मांस आणि वाहतुकीसाठी वापरलेली बोलेरो गाडी जप्त केली आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२५ तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५(क), ९ आणि ९(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.







